जिद्द कशी असावी



  जिद्द कशी असावी...


जिद्द कशी असावी
जिद्द कशी असावी

टीव्ही वरती बातम्या बघत असताना माझ्या मनात एक प्रश्न सारखा रेंगाळत होता, काय कमी आहे ह्यांना.अमाप पैसा आहे.यांचं नाव जगभर प्रसिद्ध आहे.सर्व लोकं ह्यांना मानतात.सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती  नक्कीच असेल.मुलं बाळं सर्वजण अगदी अमाप संपत्ती बाळगून असतील.सर्वजणच चांगलं नाव कमवून आहेत.आजवर खूप मोठ्या मोठ्या पदावर विराजमान झाले आहेत.राज्याच्या व देशाच्या राजकारणात खूप मोठं नाव आहे.राज्य आणि देश पातळीवर खूप मोठी आणि महत्वाची मंत्रीपदे सांभाळली.स्वतःच्या पक्षाला शून्यातून उभं करून राज्यात व देशात महत्वाचं  नाव मिळवून दिलं.

हे सगळं खूप चांगलं चालू असतानाच नशिबानं त्यांच्यावर घाला घातला आणि  एका आजारानं त्यांची पाठ धरली. पण त्या दुर्धर आजारावर ही मात करून व त्याच्याशी दोन हात करून पुन्हा हा माणूस उभा राहिला आणि नुसता उभा राहिला नाही तर तितक्याच जोमानं,जोशाने आणि नवउमेदीने अगदी 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढं काम आजही 80 व्या वर्षात हा माणूस करतो आहे.

त्यांनी पक्षातील सर्व लोकांना मोठं नक्कीच केलं असेल.यांचा वापर करून आजवर पक्षातील लोकं नक्कीच मोठी झाली असतील.परंतु आज हीच लोकं यांना सोडून निघून गेलीत पण नुसतीच सोडून गेली नाही तर खूप सारे आरोप ठेऊन गेलीत.

मी एक 40 वर्षाची बाई. बऱ्याचदा म्हणत असते की  "झालं की आपलं आता".चाळीशी गाठली.आता किती राहिले दिवस.झालो  की म्हातारे आता.प्रत्येक वेळी आपण आपल्या वयाचं कारण पुढे करतो. मी धडधाकट आहे.खूप शिकले आहे.बऱ्यापैकी मी माझे विचार मांडू शकते.स्वतःच्या पायावर उभी आहे मात्र प्रत्येक वेळी वायाचं कारण सांगून कामं टाळण्याचं काम करत असते.मी स्वतः ला एका विशिष्ट चौकटीत ठेवलं आहे.त्या चौकटीच्या बाहेर जाण्यास मी तयार नसते.तिथं मी वयाची बंधनं घालून ठेवली आहेत.ही बंधनं मी झुगारून देत नाही.मी माझ्याबरोबर माझ्या मनालाही म्हातारं बनवलं आहे.

पण जेव्हा मी यांना  टीव्ही वर पाहते तेंव्हा विचार करते की , केवढी ही महत्वकांक्षा, केवढी ती जिद्द, केवढी ती इच्छाशक्ती,आत्ताच्या तरुण पिढीलाही लाजवेल एवढा कामाचा व्याप.पक्ष पूर्ण खिळखिळा झाला असताना पुन्हा पक्षाला भरारी देण्यासाठी तितक्याच जोमानं आणि जोशानं हे कामाला लागले आहेत.

हे म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत.

आपल्या पक्षातील चांगली चांगली लोकं जी पक्षाच्या जीवावर मोठी झाली,चांगला नावलौकिक मिळाला, ती सर्वजण सोडून गेल्यावर त्यांना काहीही न बोलता पुन्हा कामाला लागले. नुसते कामाला नाही लागले तर 25 वर्षाच्या पोरालाही लाजवेल असा तो जोश होता.पक्षाला पुन्हा वर काढण्यासाठी आणि पक्षातील लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी ऊन,वारा, पाऊसही अंगावर झेलला.लोकांना पुन्हा एकत्र जोडलं तेही वयाच्या 80 व्या वर्षात.हे दुसरं कुणीही नाही करू शकत.त्याच्यासाठी खूप महत्वकांक्षी असावं लागतं.

मी म्हणाले असते "जाऊ दे मरू दे" खूप काम केलं,भरपूर नाव कमावलं,आता निवांत बसू .पुरे झाली दगदग.माझी जबाबदारी संपली आता.मुलाबाळांच्या कडे सगळं सोपवून रिकामं होऊयात.किंवा असंही होईल की एवढी वर्ष मी जगेन की नाही माहीत नाही.कारण मी यांच्या एवढी महत्वकांक्षी तर नक्कीच नाही,एवढी ध्येयवेडी तर मुळीच नाही आणि मुख्य म्हणजे मनाने तरुण आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगते की नाही  हेही माहीत नाही.

पण एवढं नक्कीच समजलं आहे की माणसानं महत्वकांक्षी कसं  असावं,ध्येय वेढे होऊन काम कसं करावं, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा, दृढ विश्वास आणि दृढ निश्चय कसा असावा, प्रबळ इच्छाशक्ती कशी  असावी, सर्व काही निसटून चाललं असताना पुन्हा नवी घडी कशी बसवावी,शून्यातून पुन्हा विश्व निर्माण कसं करावं, घडलेल्या गोष्टी मागे सोडून पुन्हा उभं कसं रहावं,माझ्यासारख्या असंख्य लोकांसाठी प्रेरणास्त्रोत कसं बनावं.

मला असं वाटतं की आपली मनस्थिती बदलली की आपली परिस्थिती नक्कीच बदलते.फक्त गरज आहे आत्मविश्वासाची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची. आपल्याबरोबर कुणी असो व नसो आपण धरलेला मार्ग कधीच सोडायचा नाही.वयाची बंधनं झुगारून आपलं ध्येय गाठण्यासाठी मध्येच न थांबता शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत रहायचं हेच खरं तर यशाचं गमक आहे. याच्यातच आपल्या कष्टाचं फळ आहे.

(हा लेख मी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2019-2020 चालू होत्या तेंव्हा लिहिला होता.तेंव्हा मी कुठेही प्रकाशित केला नाही.कारण मी असा विचार केला की लोकांना वाटेल मी राष्ट्रवादी पक्षाची कार्यकर्ता आहे की काय.माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही.पण पवार साहेबांची ती जिद्द, त्यांचं ते राजकारण ,पक्ष पुरता बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी त्यांची चाललेली धडपड, टीव्ही चॅनेल वर एकच नाव सतत गाजत होतं हे पाहून माझ्या मनात जे वीचार आले ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.)


लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप--9511775185


Post a Comment

10 Comments

  1. Khup chan ������

    ReplyDelete
  2. Khrch ichhashkti asel tr kontich gost ashky nahi��

    ReplyDelete
  3. A strong will power of man irrespective of age with suitable efforts achieves any assigned target.This article gives good inspiration to young generation.

    ReplyDelete
  4. Agdi brobr mansaachi willpower mansaala sarv kahi prapt krun dete

    ReplyDelete
  5. खूप छान प्रकारे विचार मांडलेत. सहमत आहे.

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏