सुख म्हणजे नक्की काय असतं ?
सुखी जीवन |
खरंच काय आहे सुख? कशाला म्हणायचं सुख? सुखाची व्यख्या काय?
सुखाची व्यख्या ही प्रत्येकाची वेगळी आहे.सुख हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतं.कुणासाठी बंगला, गाडी, बँक बॅलन्स म्हणजे सुख आहे तर कुणासाठी दोन वेळचं पोटभरून अन्न खायला मिळणं म्हणजे सुख आहे.
"पण एखाद्या गोष्टीमुळे आपल्या चेहऱ्यावर जे हास्य फुलतं, जो आनंद दिसतो ते म्हणजे सुख".
"आपण आपल्या आयुष्यात समाधानी असणं म्हणजे सुख".
"दिवसभर काम करून रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या शांत आणि बीनघोर झोप लागणं म्हणजे सुख".
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या श्लोक मधून सांगितलं आहे,
जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधून पाहे
मना त्वाची रे पूर्वसंचित केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले।
या जगामधील प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे धावत आहे पण मनाच्या सुखाचं काय? भौतिक सुखाच्या मागे धावता धावता छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याचे क्षण माणूस हातातून घालवत आहे.भौतिक सुखासाठी इतरांच्या बरोबर स्पर्धा करता करता त्याच्या आयुष्यात येणारे आनंदाचे क्षण तो जगायलाच विसारतोय.
श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि शोध घ्या की, जगामध्ये सर्वसुखी असा कोण आहे.जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्याच्या मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फेऱ्यातून जायचं आहे.मात्र हे मानवा तुझं तूच ठरव तुझं सुख कशात आहे.
यालाच सुख म्हणतात |
एखाद्या नव दाम्पत्याला ते आईवडील होणार असल्याची खात्री होते तेंव्हा त्यांना झालेला आनंद म्हणजे सुख आहे.
आपल्या मुलाला जन्म देताना आईला खूप यातना सोसाव्या लागतात मात्र ते चिमुकलं,गोंडस बाळ पाहून त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो,जे समाधान दिसतं ते म्हणजे सुख.
हेच तिचं पिल्लू जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आई म्हणायला लागतं तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद म्हणजे सुख.
शाळेतील परीक्षेत पहिला नंबर आल्यावर त्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद म्हणजे सुख.
नेहमी सर्व विषयांत नापास होणारा विद्यार्थी एखाद्या विषयांत पास झाल्यावर मी पास होऊ शकतो ही भावना म्हणजे सुख.
बोर्ड च्या परीक्षेत 35% गुण मिळवून पास झाल्यावर जणू बोर्डात पहिला आल्याचा जो आनंद निर्माण होतो ते म्हणजे सुख.
बोर्ड परीक्षेत शेवटच्या मिनिटाला एखाद्या विद्यार्थ्यांला एखाद्या प्रश्नाचं उत्तर कॉपी करायला मिळाल्यावर जो उत्साह निर्माण होतो ते म्हणजे सुख.
आपल्याला आपल्या मित्राची आठवण यावी आणि अचानक पणे तो आपल्या समोर उभा रहावा यामुळे जो आश्चर्ययुक्त आनंद मिळावा ते म्हणजे सुख.
आपली आर्थिक परिस्थिती जेंव्हा नाजूक होते आणि समोरून मदतीचे हात मिळतात ते म्हणजे सुख.
नऊ दिवस उपवास करून शेवटच्या दिवशी उपवास सोडताना भाजी भाकरी खायला मिळाल्यावर जे मन तृप्त होतं ते म्हणजे सुख.
अन्न पाण्याविना भटकत असणाऱ्या भिकाऱ्याला कुणीतरी शिळंपाकं खायला घातल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान म्हणजे सुख.
वाढदिवसाच्या दिवशी लहान मुलाला छान खेळणं भेट म्हणून मिळाल्यावर त्याचं ते उड्या मारणं म्हणजे सुख.
क्रिकेटचा सामना खूप रोमांचक होत चालला असता शेवटच्या बॉल वर धाव घेऊन विजय खेचून आणणे म्हणजे सुख.
Running Marathon |
ऑलिम्पिक असो किंवा कोणतीही पळण्याची स्पर्धा असो अगदी काही मिली सेकंदाच्या फरकाने फायनल लाईन क्रॉस करणं म्हणजे सुख.
वीस रूपायचं लॉटरीचं तिकीट घेऊन फक्त पन्नास रुपयेचं बक्षीस मिळल्यावर सुद्धा त्या व्यक्तीला झालेला आनंद म्हणजे सुख.
बुडतं जहाज |
तुफान आलेल्या,खवळलेल्या समुद्रात एखादं जहाज अडकलं असेल आणि जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला असेल अशा परिस्थितीत समोरून एखादं जहाज देवासारखं त्यांच्या मदतीला धावून येणं म्हणजे सुख.
दिव्यांग व्यक्तींना मदत करा |
एसटी स्टँड मधून सुटलेली बस पळत जाऊन पकडणं आणि त्यातूनही बसायला सीट मिळणं यामुळे होणारा आनंद म्हणजे सुख.
एखाद्या कैद्याला फाशी झाली असेल आणि काही कारणास्तव फाशीची तारीख पुढे गेली यामुळे थोड्या वेळासाठी का होईना त्याला जगायला वेळ मिळाला यामुळे त्याला झालेला आनंद म्हणजे सुख आहे.
परदेशात वास्तव्यास असणाऱ्या आपल्या मुलाचा फोन येणार आहे या गोष्टींमुळे त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद म्हणजे सुख.
सुखी शेतकरी |
पहिली शाळा,पहिला निकाल,पहिलं कॉलेज,पहिली नोकरी,पहिला पगार,पहिलं प्रमोशन,पहिलं अपत्य ,पहिली सहल,पहिली गाडी,पहिलं घर या सगळ्या पहिली वहिल्या गोष्टींमुळे आपण आपल्या आयुष्यात खूपच आनंदी झालो,समाधानी झालो ते म्हणजे सुख.
क्षणाक्षणाला आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात,अनेक घटना घडतात ज्याच्यामुळे आपण आनंदी होतो ,समाधानी होतो.या सर्व घटना असे सर्व प्रसंग आपल्या आयुष्यात सुख घेऊन येतात.आपण या सर्व क्षणांचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे.हे सर्व क्षण भरभरून आठवणींत राहतील असं जगलं पाहिजे.
स्पर्धा एवढी वाढली आहे की, भौतिक गोष्टींच्या मागे धावता धावता माणूस आनंदाने जगणं विसरून चालला आहे.रोज नवीन गोष्टींचा ध्यास घेण्याच्या नादात त्याच्याजवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्यायचा मात्र विसरत चालला आहे.
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजूनच सुंदर कसं बनवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे.आपल्याकडे लाखो करोडो रुपयांच्या सर्व भौतिक सुखसुविधा असतीलही मात्र आपण आनंदी नसू, समाधानी नसू तर त्या सुविधांची किंमत शून्य आहे.
श्री संत रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपणच आपल्या मनाला विचारलं पाहिजे महागड्या लाखो करोडोंच्या वस्तू म्हणजे आपलं सुख आहे की छोट्या छोट्या गोष्टी ज्यामुळे आपण समाधानी होतो ,आनंदी होतो ते म्हणजे सुख.
रोज आनंदी राहून आपण चिंतामुक्त जीवन जगलं पाहिजे.यामुळे आपल्या मेंदूवरचा ताण वाढणार नाही आणि शरिराला वेगवेगळ्या व्याधी जडणार नाहीत.यालाच तर सुखी,समाधानी आयुष्य म्हणायचं.
म्हणूनच आपल्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर आपल्या आयुष्यात येणारे आनंदाचे क्षण म्हणजे सुख.
आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या गोष्टी म्हणजे सुख.
लेखन,
डॉ. मनिषा मोरे
2 Comments
Lekh khup sundar lihila ahe
ReplyDeleteNICE
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏