दिवाळी सणाचं महत्त्व
सण दिव्यांचा |
दिवाळी सण काय आहे?
भारतामध्ये साजरा केला जाणार सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय.दिवाळी सण हा हिंदू संस्कृती मधील सर्वात मुख्य सण आहे.दिवाळी सणाला दीपावली असं देखील म्हंटलं जातं. दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव.हा सण दरवर्षी शरद ऋतूत अश्विन अमावस्येला साजरा केला जातो.पाच दिवस चालणारा हा सण लहानापासून थोरांपर्यंत तसेच गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच स्तरातील लोकं साजरा करतात.प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो.नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या सणाला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिवाळी म्हणजे
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे.दीप + आवली म्हणजे ( रांग, ओळ ) म्हणजे दिव्यांची रांग किंवा ओळ.
चौदा वर्ष वनवास संपवून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने दीपोत्सव करून राजाच्या प्रति आपला आनंद साजरा केला.तेंव्हापासून दीपावली हा सण साजरा करण्याची प्रथा पडली आहे.दीपावली सणाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात.
काय आहे दिवाळी सणाचं महत्त्व
दिवाळी सणाचं एक वेगळेपण आहे.हा सण आनंदाचा आहे.हा सण उत्साहाचा आहे.हा सण दुःखातून सुखाकडे नेणारा आहे.हा सण दिव्यांचा आहे.हा सण रोषणाई चा आहे.हा सण अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा आहे.हा सण अंधकारावर मात करून आपलं आयुष्य प्रकाशमय करण्याचा आहे.
हा सण आहे आपल्या प्रियजनांना अगदी मनापासून आणि प्रेमाने भेटवस्तू देण्याचा.फराळाचे वेगवेगळे पदार्थ म्हणजेच लाडू,चिवडा,चकली,करंज्या, शंकरपाळे आणि असे बरेच गोड आणि तिखट पदार्थ करून आपल्या प्रियजनांना बोलावून खायला घालण्याचा.
दिवाळीला जोडून आलेले सण म्हणजे वसुबारस, धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,दीपावली पाडवा आणि भाऊबीज.
वसुबारस
अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला सुरू होतो.या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते.गोडाचा नैवेद्य करून जनावरांना खायला घातला जातो.
धनत्रयोदशी
अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.या दिवशी सोनं, नानं याच्यासह लक्ष्मीची पूजा केली जाते.व्यापारी लोकांसाठी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी या दिवसाचे फार महत्व आहे.वैद्यकीय क्षेत्रात धन्वंतरीची पूजा केली जाते.
अश्विन कृष्ण चतुर्थीला नरकचतुर्थी साजरी केली जाते.सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करून तेलाचे दिवे लावले जातात आणि वातावरण प्रसन्न केलं जातं.विशेष म्हणजे दिवाळी सणातील अंघोळ सुगंधी उटणं लावून केली जाते.सोबत सुगंधी तेल आणि अत्तर देखील लावलं जातं.
लक्ष्मी पूजन
अश्विन अमावस्या या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं.आपल्या घराला,व्यवसायात अजून बरकत मिळावी,लक्ष्मीची कृपा व्हावी आणि अवलक्ष्मीचा वास नाहीसा व्हावा म्हणून घरातील सर्व लहान थोर मंडळी,सर्व व्यापारी लोकं भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करतात.दिव्यांची रोषणाई करतात.रोंगोळ्या काढुन त्याला झेंडूच्या फुलांनी सुशोभित करतात.आकाशकंदील लावून प्रकाश रंगीबेरंगी करतात.मातीच्या रंगबिरंगी छोट्या पणत्या तेलाने भरून लावततात.फटाक्यांची आतषबाजी केली जाते.
दिवाळी पाडवा
दिवाळीचा चौथा दिवस हा कार्तिक शुद्ध प्रतिपदेस असतो.या दिवसाला प्रतिपदा किंवा बलिप्रतिपदा नावाने ओळखले जातो.या दिवसालाच दिवाळी पाडवा असं देखील म्हंटलं जातं.या दिवशी विवाहित दाम्पत्य एकमेकांना छानसे उपहार देऊन खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात.ग्रामीण भागात विशेषतः जनावरां गोवर्धन पर्वत काढला जातो आणि बळीची पूजा केली जाते.
भाऊबीज
पाच दिवस चालणाऱ्या दिवळी सणाची सांगता भाऊबीज या सणानं होते.भाऊ बहिणीचं अतूट नातं आणि त्यांचं एकमेकांवरील पवित्र प्रेम दर्शविणारा हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.या दिवशी भाऊ बहीण एकत्र येऊन बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाचा आशिर्वाद घेते. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.भाऊ बहिणीला छान छान भेटवस्तू देऊन खूष करतो.
भारतीय संस्कृतीतील, हिंदू संस्कृतीतील पाच दिवसांचा मुख्य असणारा हा सण वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या आस्थेने आणि श्रद्धेनं साजरा केला जातो.प्रत्येक प्रांतात प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रचलित जरी असल्या तरी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे.दिवाळी सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक खूप शुभ दिवस मानला जातो.
0 Comments
तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏