Mazi Shala
माझी शाळा
माझ्या आठवणींतील माझी शाळा -
कन्या शाळा कामेरी
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा
गुरु:साक्षातपरब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमह।।
कन्या शाळा कामेरी |
काल माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि माझी विचारपूस करायला लागली.खूप दिवसांनी नव्हे तर खूप वर्षांनी आम्ही दोघी फोनवर गप्पा मारत होतो.जवळ जवळ 28 वर्षांनी आम्ही दोघी बोलत होतो.एकमेकींची चौकशी करून झाली.हालहवा विचारून झाली.त्यानंतर पुढचा एक सव्वा तास फक्त आणि फक्त शाळेच्या गप्पा सुरु होत्या. शाळेतील आठवणी काढून आम्ही दोघीही खूप वेळ बोलत होतो.खूप आनंद झाला होता आम्हा दोघींनाही.तिच्या एका फोन कॉल मुळं शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला होता .
आमच्या दोघींचं बोलणं झाल्यावर क्षणभर मी विचार केला,वेगवेगळ्या विषयांवर मी लेख लिहीत असते. 5 सप्टेंबर ला शिक्षक दिन आहे,या दिनाचं औचित्य साधून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना , शाळेच्या आठवणींना या लेखच्या सर्वांच्या समोर आणू शकतो.या लेखच्या माध्यमातून माझ्या गुजगोष्टी ब्लॉग च्या माध्यमातून थोडासा उजाळा द्यायचा प्रयत्न का करू नये?. माझ्या सर्व शिक्षकांच्या शिकवणीला , शिकवणीतून त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले आम्हाला पदोपदी मार्गदर्शन केलं , आम्ही चुकत असू तर वेळोवेळी कानउघडणी केली अशा माझ्या सर्व शिक्षकांच्या माझ्या मनातील आठवणींना उजाळा दयावा म्हणून हा लेख लिहायला घेतला.
खरं तर माझं संपूर्ण शिक्षण हे मामाकडेच झालं.घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मी आणि माझी बहिण आम्ही दोघी मामाकडे राहत होतो.सातवीपर्यंतचं शिक्षण हे जी.प.मराठी मुलींची शाळा कामेरी इथं झालं.
इयत्ता आठवी ला मी कन्या शाळा कामेरी इथे जायला लागले.पहिल्याच दिवशी वर्गशिक्षिका म्हणून पट्टेकरी मॅडम वर्गावर आल्या.आमची ओळख विचारून झाल्यावर हिंदी विषय शिकवायला घेतला.मला पहिल्यापासूनच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पटकन द्यायची सवय होती त्यामुळे मॅडम नी प्रश्न विचारताच मी पटकन उत्तरे देऊन टाकली आणि पहिल्याच दिवशी मॅडम चं मन जिंकलं.पुढे तीन वर्षे पट्टेकरी मॅडम आमच्या वर्गशिक्षिका राहिल्या.त्यांनी आम्हाला हिंदी आणि इतिहास हे विषय शिकविले.
तीन वर्षात त्यांच्या चेहऱ्यावर एकदाही अमच्याविषयी राग दिसला नाही.अतिशय मधुर आणि हळू आवाजात त्या शिकवायच्या.त्या काळात मला 10वी ला हिंदी या विषयात 100 पैकी 89 गुण मिळाले होते.मॅडम सांस्कृतिक कार्यक्रमांची ही तयारी करून घेत.नाटक, एकांकिका, डान्स,भाषणं लिहून देऊन त्याची ही त्या तयारी करून घ्यायच्या. दोन तीन वेळा त्यांनी लिहून दिलेलं भाषण मी भाषण स्पर्धेत नंबर मिळवून आले होते. पट्टेकरी मॅडम आमच्या सर्वच मुलींच्या खूप आवडत्या होत्या.
आमच्या मुळीक मॅडम बद्दल तर काय सांगावं, खूप शांत आणि हसरा स्वभाव.चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य.भूगोल आणि अर्थशास्त्र इतकं छान शिकवलं , आजही बऱ्याच कन्सेप्ट लक्षात आहेत.राज्ये,राजधान्या अगदी तोंड पाठ असायच्या.बिना नकाशा पाहता पूर्व ,पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशा सांगून वेगवेगळे सरोवरे,पर्वत,नद्या ,राज्य ,शिखरे या सर्व गोष्टी डोळे मिटवून सुद्धा नकाशावर सांगू शकत होतो आणि आजही त्या सर्व गोष्टी लक्षात आहेत.शांत स्वभाव, आणि कधीही न रागावता किंवा ओरडता शिकविण्याच्या पद्धतीमुळे मुळीक मॅडम आमच्या खूप आवडत्या होत्या.
आमचे मोहिते सर इंग्लिश हा विषय शिकवीत होते.सरांच्या स्वभावाबद्दल काय बोलावं, थोडेशे हळवे आणि तितकेच प्रेमळ होते.सरांना जास्त रागावता येत नव्हतं त्यामुळे मुली खूप दंगा करायच्या, खूप आगाऊपणा करायच्या त्यामुळे ते पटकन चिडायचे. आणि काही सेकंदांमध्येच पुन्हा हसत खेळत मुलींच्या बरोबर प्रश्नोत्तराच्या गप्पा मारत शिकवायचे.
खासकरून मी आणि माझ्या बरोबर असणाऱ्या खेळातील मुली सरांच्या जास्त संपर्कामध्ये असायचो.आमची टीम बनवून आम्हाला कबड्डी, खोखो खेळायला शिकविले व जास्तीतजास्त सराव करून घेऊन स्पर्धेला घेऊन जात असत.मी या टीम मध्ये कप्तान म्हणून काम करायचे.थाळी फेक आणि गोळा फेक या वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये मी सलग तीन वर्षे विभागीय स्तरापर्यंत पदक मिळविले होते.आणि सांगली,कोल्हापूर,इस्लामपूर या सर्व ठिकाणी मोहिते सर मला स्पर्धेला घेऊन जायचे.कधी कधी मी आणि माझी मैत्रीण स्मिता आम्ही दोघीच सरांच्या बरोबर असायचो आम्हाला कधीही एकटेपणाची भीती वाटली नव्हती.इतका विश्वास सरांच्यावर होता.खेळाशी तसेच आयुष्याशी निगडित खूप महत्त्वाचे सल्ले सर द्यायचे आणि आत्मविश्वास वाढवायचे.मोहिते सरांच्या रूपाने खूप छान सर आम्हाला लाभले.
के एम पाटील सर विज्ञान आणि भूमिती हे विषय घेत होते.खूप बारीक आणि नाजूक आवाज तसेच खूप बारीक शरीर यष्टी त्यामुळे या सरांना देखील मुली खूप त्रास द्यायच्या.पण सरांचं एक नाही अन दोन नाही."बे एक्के बे " शिकवायचं आणि समजलं का म्हणून विचारायचं. समजलं म्हंटलं की तास संपला की निघून जायचं.त्यांनी मुलींना कधीच त्रास दिला नाही.नंतर आम्हाला समजलं की सरांना खूप मोठ्या आजारानं ग्रासलं होतं आणि त्यातच त्यांना परमेश्वराने आपल्या जवळ बोलावून घेतलं.आणि एका चांगल्या शिक्षकाला शाळेनं गमावलं.सर तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला आणि तुमच्या शिकवणीला सलाम 🌹🌹🌹🌹🙏🙏.
गणित आणि भूमितीसारखा अवघड विषय सोपा करून शिकविणारे आमचे लोहार सर आणि मुळीक सर.दोघेही खूप हुशार.लोहार सरांचा आणि आमचा संपर्क तीन वर्षांचा.या तीन वर्षांत सरांनी गणित हा विषय खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकविला.आम्ही नवविला आल्यावर नेमका अभ्यासक्रम बदलला होता.पण बदललेला अभ्यासक्रम देखील खूप सोपा करून सरांनी शिकविला.सरांना ते फळ्यावर गणित सोडावीत असताना मागे मुली चुळबुळ करत बसलेल्या आजिबात आवडायचं नाही.थोडेसे रागवायचे पण लगेच शांतही व्हायचे आणि लगेच मुलींना प्रश्न विचारून " बरोबर आहे का " हा त्यांचा फेव्हरेट शब्द बोलून पुढचा पॉईंट शिकवायला घायचे.
गणितं सोडविण्यासाठी सोप्या ट्रिक्स सांगायचे आणि जास्तीजास्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करायचे.10वी ला गेल्यावर पुन्हा अभ्यासक्रम बदलला होता.हा बदललेला अभ्यासक्रम देखील खूप छान सोपा करून शिकविल्यामुळे मला गणिताला खूप चांगले गुण मिळाले होते.अवघड विभागातील प्रश्न देखील मी अगदी सहजपणे सोडवत होते.भूमितीय प्रमेय तरी सरांनी पाठच करून घेतली होती.खूप अवघड असा हा भूमिती विषय जास्त स्पष्टीकरण आणि कारणं यावर भर असणारा हा विषय. आकृत्या कशा काढायच्या आणि त्याची उकल कशी करायची तसेच लक्षात कसं ठेवायचं या सर्व गोष्टी खूप छान शिकविल्या होत्या.
मुळीक सरांची शिकविण्याची पध्दत देखील खूप छान आणि सहज होती.आठवी आणि नववी हे दोन वर्षे सरांनी गणित विषय शिकविला.तसं पहायला गेलं तर त्यावेळेस सर फार तरुण होते.तसे सर्वच सर आणि मॅडम वयाने फारच तरुण होते मात्र मुलींच्याकडे बघायचा सरांचा दृष्टिकोन एक गुरू आणि शिष्य असाच होता.प्रत्येक विद्यार्थीनीला अगदी तो विषय समजत नाही तोपर्यंत शिकविण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे मुळीक सर जास्त फेव्हरेट झाले होते.तसे ते वर्गात शिकवणं सोडून जास्त वेगळं असं काहीच बोलायचे नाहीत.
थोडासा लाजरा पण प्रेमळ स्वभाव आणि कोणतंही गणित असो किंवा भूमितीय प्रमेय असो पटकन सोडवून विध्यार्थीनीना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पटकन देणारे अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.सरांनी शिकविलेले बरेच पॉईंट आजदेखील लक्षात आहेत आणि मला पुढे प्रोफेसर म्हणून काम करत असताना त्या सर्व गोष्टी माझ्या शिकविण्यात देखील उपयोगी पडत आहेत.
माझी इंग्रजी भाषेची गोडी निर्माण होण्याचं आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचं सर्व श्रेय हे आमच्या शाळेचे आमचे लाडके नाना ( सर ) यांना जातं. तसं खूप अगोदरपासूनच माझा इंग्रजी विषय बरा होता.मात्र तो अजूनच चांगला बनविण्याचं काम आमच्या नानांनी केलं.इंग्रजी व्याकरण तरी एवढं चांगलं करून घेतलं होतं की,आजही माझ्या प्रोफेशन मध्ये त्याचा अतिशय चांगला वापर होत आहे.
नाना म्हणजे प्रदीप पाटील सर.पण त्यांना सर म्हणून आम्ही कधी बोलावलंच नाही.नाना या नावानेच त्यांची पूर्ण शाळेत ओळख होती. खूप हुशार व्यक्तिमत्त्व असणारे आमचे नाना परमेश्वराने लहानपणीच त्यांच्यावर अवकृपा दाखविली आणि त्यांना अपंगत्व प्राप्त झालं.मात्र या व्यंगामुळे रडत कुढत न बसता त्यावर त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाने यावर मात केली.एक स्वतंत्र असं हुशार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळळ निर्माण केली होती.त्यांच्याकडे कोणतं ज्ञान नव्हतं असं नाही.त्यांना इंग्रजी येत होतं,विज्ञान येत होतं,इतिहास,भूगोल अर्थशास्त्र "अरे बाप रे "! त्यांना तर सगळ्यातलं सगळंच येत होतं.
करियर मार्गदर्शन करणं, प्रेरणादायी सुविचार सांगणं,प्रोत्साहन देणारे लेख वाचून दाखवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नेहमी वास्तविकतेची जाणीव करून दिली.त्यांनी करियरची स्वप्न बघायला शिकवलं.करियर करून आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल या सर्वांची बीजं नानांनीच आमच्या मनात बिंबवली. माझ्या मनावर नानांच्या मुळेच वेगळं करियर आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व या गोष्टींचा याचा ठसा उमटला होता.खरंतर योग्य वयात योग्य ते मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. आणि हेच मार्गदर्शन मला माझ्या शाळेनं केलं,माझ्या शाळेतील शिक्षकांनी केलं,खासकरून नानांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे.
मला आजही चांगलं आठवतंय , मी नवविला असताना दूरदर्शनवर "दामिनी " ही मालिका सुरू होती.त्या मालिकेतील मुलगी प्रत्येक प्रसंगाला कशी धाडसाने तोंड देते आणि अन्यायाला वाचा फोडते हे दर्शविणारी ही मालिका पाहून नाना तुम्ही मला " दामिनीची " उपमा दिली होती.
नानांच्या बाबतीत एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शिक्षण संस्था ही त्यांचीच होती.शाळेचे संस्थापक प्रा.अनिल पाटील सर याचे लहान भाऊ.थोडक्यात काय तर शाळेचे मालकच होते ते ,पण या गोष्टीचा रुबाब त्यांनी कधीच दाखवला नाही.त्यांना या गोष्टीचा गर्व कधीच झाला नाही. याउलट शाळेमध्ये त्यांचा वावर एक सामान्य शिक्षक म्हणूनच होता.
संपुर्ण शाळेची धुरा सांभाळणाऱ्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील मॅडम.पूर्ण शाळा त्यांना एच एम मॅडम म्हणून ओळखते.माझं आणि मॅडमचं वैयक्तिक नातं खूप वेगळं आहे.नात्याने त्या माझी मावशी आहेत.पण शाळेत माझ्यासाठी त्या एचएम मॅडमच होत्या.
मुख्याध्यापक पदाचा काहीच अनुभव नसताना तरुण वयातच मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळावी लागली.खरंतर पाठीशी अनुभव काहीच नसल्या कारणाने सर्व नियोजन करता करता खूप धावपळ व्हायची.मात्र म्हणतात ना , तुमचा "आत्मविश्वासच " तुमची मोठी ताकद असतो.अगदी तसंच एक एक काम शिकत शिकत अनुभव येत गेला आणि आत्मविश्वास ही वाढला आणि थोड्याच दिवसांत एक आदर्श मुख्याध्यापिका बनल्या.
मॅडम नी आम्हाला मराठी विषय आणि त्या विषयाचं व्यकरण शिकविलं. एखादा धडा शिकवायला घेतला की असं वाटायचं तास संपूच नये. फक्त ऐकतच रहावं असं वाटायचं.एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगायची मॅडमची पध्दत खूप वेगळी होती.आपल्या रोजच्या व्यवहारातील जास्तीत जास्त उदाहरणे घेऊन प्रत्येक मुद्दा समजावून सांगायच्या.
त्यांनी शिकविलेलं मराठी व्यकरण आजही माझ्या लक्षात आहे.वृत्ते,अलंकार,व्यकरण चालविणे हे अजूनही लक्षात आहे.त्यांनी दिलेली उदाहरणे जसे की, "हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती ". अशी अनेक उदाहरणे आजही पटकन सांगता येतील.
"समजलं का बाळांनो " या त्याांच्या विशेष शैलीत विचारपूस कराायच्या त्यामध्ये खूप आपलेपणा मलाच नव्हे तर संपूर्ण शाळेतील मुलींना वाटायचा.मावशीचं आणि माझं वेगळंच नातं शाळेमध्ये होतं. माझ्यासाठी त्या सपोर्ट सिस्टीम होत्या.शाळेमध्ये मी सर्वांच्याच ओळखीची असण्याचं कारण म्हणजे माझी मावशी.
मॅडम ना एकदा मी खूप त्रास दिला होता.प्रार्थना झाल्यावर आम्ही सर्वानी पसायदान म्हंटलं. मी थोडीशी सर्वांची लीडर असल्या सारखेच होते. मॅडमना मी पसायदान चा अर्थ विचारला.मॅडमनी "तासाची वेळ झालीय उद्या सांगतो", असं सांगितलं. मात्र मी ऐकते कुठली?. मग मॅडम नी पसायदान चा अर्थ इतक्या छान पद्धतीने आणि वेगवेळी उदाहरणे घेऊन सांगितला की, आजही माझ्या लक्षात आहे.आज जेंव्हा टिचिंगचं काम करते मला आज समजतंय की , एखादा प्रश्न अचानक एखाद्या विद्यार्थ्यांने विचारला तर काय अवस्था होते.आपली तयारी जर नसेल आणि एखादा प्रश्न अचानक आला तर थोडसं गोंधल्यासारखं होतं.पण मॅडम कधीही गोंधळून जात नव्हत्या. कधीही कोणताही प्रश्न विचारा मॅडम नेहमीच शंकेचं निराकरण करण्यात तरबेज होत्या.
स्वतःला समाजकार्यासाठी वाहून घेतलेले आमच्या शाळेचे सर्वेसर्वा प्रा. अनिल पाटील सर.संपुर्ण शाळा त्यांना दादा म्हणून ओळखते.
ज्ञानाची गंगा दिनदुबळ्या ,बहुजन समाजापर्यंत पोहचविण्याचं महान काम ज्यांनी केलं असे थोर समाजसुधारक आदरनिय कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा )यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्मवीर शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आमच्या कन्या शाळेचा जन्म झाला.सुरुवातीच्या काळात विध्यार्थी मिळत नव्हते त्यामुळे दादांनी खेडोपाडी फिरून विद्यार्थी गोळा केले व मोफत एसटी चा पास,गणवेश तसेच सर्व शालेय वस्तू दिल्या.शाळेचं नाव आजूबाजूच्या सर्व खेडोपाडी व्हावं व माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा म्हणून त्यांची सतत धडपड असायची.
10वी मध्ये माझा आमच्या दोन शाळांमध्ये पहिला नंबर आला.दादा स्वतः अभिनंदन करण्यासाठी आणि माझा सत्कार करण्यासाठी आमच्या घरी आले होते.पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व माझं पुढचं ऍडमिशन देखील त्यांनीच घेऊन दिलं होतं.एवढं महान कार्य दादांनी हाती घेतलं होतं आणि अविरत करत आहेत.
या कार्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सौ.छाया पाटील मॅडम म्हणजे सर्वांच्या लाडक्या दीदी यांची त्यांना खूप मोलाची साथ मिळाली.म्हणतात ना ," प्रत्येक यशस्वी पुरुषांमागे एका स्त्रीचा हात असतो " अगदी तसंच दादांना ही त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात त्यांच्या अर्धांगिनीची म्हणजेच दीदींची साथ होती.दोघांनीही जणू सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या कार्याचा ध्यास घेतला होता.
आमच्या शाळेतील शिक्षिका सौ.मालन पाटील मॅडम, श्रीमती सुवर्णा पाटील मॅडम यांचाही आमच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.आम्हाला प्रत्यक्षात शिकवायला जरी नसल्या तरी अप्रत्यक्षात मात्र त्या सर्व विद्यार्थिनीसोबत असायच्या.
आमच्या संस्थेच्या दोन शाळा आहेत.कन्या शाळा आणि आदर्श विद्यालय.आदर्श विद्यालय देखील आम्हाला परकं नव्हतं.त्या काळात श्री माने सर मुख्याध्यापक होते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ची परेड घेण्यासाठी आमचा आणि त्यांचा संपर्क यायचा.खूप शिस्तबद्ध असे हे सर सर्व विद्यार्थिनींना खूप कडक वाटायचे.मात्र राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण अगदी नियमबद्ध करून घ्यायचे.
अलीकडेच आम्हला त्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजली.सर तुमच्यातल्या शिक्षकाला आणि तुमच्या शिकवणीला मानवंदना 🌹🌹🌹🙏🙏🙏.
श्री व्ही एन पाटील सर देखील गणित आणि भूमिती हा विषय घ्यायचे.सर खूप शिस्तप्रिय, कडक पण खूप हुशार.विद्यार्थ्यांना खूप सुंदर अशा पद्धतीने ते शिकवायचे.प्रत्यक्षात त्यांचा एवढा संपर्क नव्हता मात्र त्यांच्याविषयी खूप चांगल्या आठवणी आहेत.
मराठी विषय अतिशय सुंदर पद्धतीने शिकविणारे श्री हंबीरराव जेडगे सर.जणू एखादी गोष्ट सांगत आहेत किंवा कथा सांगत आहेत अशा पद्धतीने कोणताही धडा शिकविणारे आणि आपल्या विशेष शैलीमध्ये " आणि मित्रांनो " असा शब्द वारंवार उच्चारणारे जेडगे सर देखील विद्यार्थ्यांचे आवडते बनले होते.शिक्षणेतर विविध उपक्रम राबविणारे सर अशी त्यांची विशेष ओळख बनली होती.
शाळेचं कार्यालय सांभाळणारे आमचे डी. टी. पाटील सर हे देखील खूप मदत करणारे होते.आमच्या निरोप समारंभा साठी त्यांनी मला खूप छान भाषण लिहून दिलं होतं मात्र भाषणाला उभी राहिले, एक दोन मिनिटं बोलले आणि रडायला लागले त्यामुळे त्यांनी दिलेलं भाषण मी पूर्ण करू शकले नाही.
आमच्या शाळेत वेळोवेळी आम्हाला मदत करणारे उमेश भैया, सरजू भैया, राहुल भैया, सदाभाऊ हे सर्वच जण खूप मदत करायचे.शाळेतील कोणतंही काम सांगितलं तर कधीही ते नाही म्हणायचे नाही.सदैव आपल्या कामात तत्पर असायचे.
माझा शाळेतील ग्रुप त्यामध्ये माधुरी , स्मिता , कल्पना, नाझनीन आणि मी असा आमचा पाच जणींचा ग्रुप होता.आमचा ग्रुप सर्वच गोष्टीत अग्रेसर असायचा.खेळ म्हणा,अभ्यास म्हणा,भाषणं म्हणा,वादविवाद म्हणा, नाटक एकांकिका इतर सांस्कृतिक कार्यक्रम सर्वच बाबतीत आम्ही उत्साहाने भाग घ्यायचो.खासकरून शिक्षक दिनाच्या विशेष आठवणी आहेत.पूर्ण दिवस संपूर्ण शाळा आम्ही संभाळायचो.तीन वर्षे मीच मुख्याध्यापिका असायचे.इथेही आमचाच ग्रुप पुढे असायचा.शिक्षक बनण्याचा आणि शिकविण्याचा एक वेगळा अनुभव आहे.इथेच शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि बनले देखील.
आमच्या शिक्षकांनी विशेषकरून पट्टेकरी मॅडमनी हुंडाबळी वर आधारित आमचं नाटक बसवलं होतं. यामध्ये मी सासूचा रोल केला होता.सांगली ला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हे नाटक आम्ही सादर केलं होतं.इथे आमचा तिसरा नंबर आला होता.खूप उल्लेखनीय अशी कामगिरी सर्वच मैत्रिणींनी केली होती.आमच्या सर्वांच्याच नेहमीच आठवणींत राहण्यासारखा आमचा परफॉर्मन्स झाला होता.माझ्या सर्वच शिक्षकांनी खूप सराव करून घेतला होता.म्हणूनच आम्हाला चांगलं फळ मिळालं होतं.
माझ्या शाळेनं आंम्हाला खूप साऱ्या आठवणींचा अनमोल खजिना दिला.सोबत आयुष्यभर पुरेल एवढी ज्ञानाची शिदोरी दिली.खूप चांगले शैक्षणिक संस्कार केले.खूप सारा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःचं ध्येय कसं ठरवावं व त्याचा पाठपुरावा कसा करावा या सर्व गोष्टींचा मौलिक सल्लाही दिला.
सन 1996 साली खूप जड अंतकरणाने पुढील शिक्षणासाठी शाळेचा निरोप घेतला.निरोप घेताना मात्र सर्वच शिक्षकांचा शिकविण्याचा गुण घेतला.
विंदा करंदीकर यांनी म्हंटल्या प्रमाणे,
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे ।।
आमच्यावर योग्य ते शैक्षणिक संस्कार करून शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविल्याबद्दल माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार.
💐 💐 🙏 🙏 💐 💐
शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
💐💐🌹🌹💐💐
5 Comments
नमस्कार,
ReplyDeleteलेख कसा वाटला ते आवश्य कळवा.तुमच्या ही शाळेच्या आठवणी जरूर सांगा.
Deleteनमस्कार ताई,
मी सौ उमा कुणाल पाटील HM मँडम यांच्या छोट्या सुनबाई.
लेख खुपच सुंदर आहे.लेखनशैली, मांडण्याची पध्दत उत्तमच आहे.मँडम जशा तुम्हाला बाळ म्हणून बोलवत असत ,तसेच त्या आज देखील आम्हा सुनांना बाळ म्हणूनच बोलवतात खुप बरे वाटते नशीब लागते अशी सासू(आई) मिळायला.
असेच लेखन करत रहा.
हीच सदिच्छा.👏
धन्यवाद उमा, तुझी कंमेंट वाचून खूप बरं वाटलं.तुझ्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार.
Deleteजुन्या आठवणी जाग्या झाले
ReplyDeleteKhup surekh mandni
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏