सण तीच्या उत्साहाचा....
सण गौरी गणपतीचा..
जेष्टा गौरी आवाहन 2020 |
तिच्या उत्साहाला सुरुवात खरंतर हरितालिकेच्या उपवासाने होते.अनेक श्रद्धा मनात ठेवून लहान वयातच केलेला हा उपवास.उपवासाच्या दिवशी अगदी सकाळी लवकर उठून स्नान उरकून हरितालिकेच्या पूजेची तयारी करण्यापासून तिचा उत्साह सुरू होतो.हा उत्साह इतका असतो की,या दिवशी कुणी निर्जल तर कुणी फळफळाव खाऊन आपली पूजा संपन्न करतात.हरितालिकेची पूजा मांडण्यासाठी फळफळावळ गोळा करणं, फळांच्या झाडांची छोट्या छोट्या फांद्या,वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणून पूजा मांडली जाते.हरितालिकेची कथा वाचली जाते आणि आरती केली जाते.पूजा पाहण्यासाठी आणि हरितालिकेची कथा ऐकण्यासाठी आजूबाजूच्या सर्व मुली,व महिला जमा होतात.साखरेचा आणि फळांचा नैवेद्य दाखवून पूजा संपन्न होते.दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून उपवास सोडला जातो.या पूर्ण दिवसात तिला थोडीशी ही भूक लागत नाही तसेच तिला थकल्या सारखं ही वाटत नाही.या उपवासाच्या मागे प्रत्येकाच्या भावना मात्र वेगवेगळ्या असतात.
हरितालिका पूजन 2020 |
हरितालिका पूजन 2020 |
या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी गणेशचतुर्थी असते.बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते.बाप्पाच्या आरासेचं साहित्य खरीदी करून आरासेची सर्व तयारी करणं तसेच बाप्पाच्या आरती नंतर दर दिवशी वेगवेगळा प्रसाद याची तयारी सुरू होते.वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, पेढे, बर्फी, जिलबी, प्रसादाचा शिरा, मोतीचुरचे लाडू अरे बाप रे किती हे प्रसादाचे प्रकार !,.हे झालं बाप्पाच्या आरती च्या वेळी सर्वांना देण्यासाठी चा प्रसाद.
ही लगबग सुरू असतानाच तिची गौरी सणाच्या आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या सर्व फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू होते.एक से बढकर एक पदार्थ.लाडू, चकल्या, चिवडा, करंज्या,शंकरपाळे,अनारसे हे सर्व पदार्थ घरी बनवले जातात.हे पदार्थ कमी की काय म्हणून बर्फी,पेढे,बाकरवडी, जिलेबी हेही पदार्थ बाजारातून विकत आणले जातात.हे सर्व करताना तिचा आनंद द्विगुणित झालेला असतो.गौराईच्या आगमनानेच तिचा उत्साह ओसंडून वाहत असतो.
गौराईला दरवर्षी वेगवेगळा पोशाख आणि डेकोरेशन केलं जातं.या पोशाखाचं नियोजन गौराई च्या आगमनाच्या खूप अगोदर पासूनच केलं जातं.गौराई साठी नवीन साड्या,काष्टे ,घागरे,वेगवेगळ्या प्रकारचे दागिने त्यामध्ये डोरली, गंठन,लक्ष्मीहार, बोरमाळ, कोल्हापुरी साज ,नथ, कानातील झुमके,कमरपट्टा, बाजूबंद, मेकला,मुकुट तसेच वेगवेगळे गंगावन व आंबाडे आणि त्यावर माळण्यासाठी गजरे,वेण्या आणल्या जातात.वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या देखील गौराईसाठी घेतल्या जातात.
गौराईचे मुखवटे तरी किती सुंदर !, सुबक,रेखीव व मनमोहक.गौराईला ज्या विशिष्ट पोशाखात विराजमान करायच्या आहेत त्याप्रमाणे सर्व प्रकारचं डेकोरेशन. मग त्या डेकोरेशन ची तयारी.बाप रे किती हा साजशृंगार गौराईचा!. हे एवढं सगळं करताना तिचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो.
हा सण सुवासिनी चा, हा सण तरुण मुलींचा.गौरी आवाहनाच्या दिवशी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे नटून थटून मोठ्या उत्साहात तरुण मुलींच्या हस्ते किंवा सुवासिनीच्या हस्ते गौराईला घरांमध्ये घेतलं जातं.काही ठिकाणी झाडपाल्याच्या गौराई चा मान असतो.तरुण मुलीं नवनवीन साड्या नेसून घोळक्याने शेतावर जातात व गौराई घेऊन येतात व तुळशिजवळ ठेवल्या जातात.आणि मुलींचे पाय धुवून हळदीकुंकू लावून गौराईची गाणी म्हणत त्यांना घरात घेतलं जातं.काही ठिकाणी गौराईचे मुखवटे बाहेर तुळशिजवळ ठेवले जातात.घरची सुवासिनी बाई शेजारच्या सुवासिनींना हळदीकुंकू ला बोलावते.गौराई ला व तुळशीला हळदीकुंकू वाहिलं जातं.गौराईची लाल रंगाणे पाऊले उमटवली जातात.अशाप्रकारे गौराई ला घरामध्ये घेतलं जातं.
गौराई आगमन - 2020 |
गौरी आवाहन झालं की मग गौराईला आसनस्थ केलं जातं.तिला पोशाख परिधान करून साजशृंगार केला जातो.दागदागिने घालून,वेगवेगळे पोशाख घालून,वेण्या आणि गजरे माळून अगदी नव्या नवरीला नटवावी असं नटवून तयार केलं जातं.गौराई चा साजशृंगार झाला की सर्व प्रकारचे फराळाचे पदार्थ तिच्या समोर प्रसाद म्हणून ठेवली जातात.हे सर्व पाहून असं वाटतं जणू नवरी नटून थटून लग्नासाठी उभी आहे आणि तिला सासरी जाण्यासाठी न्याहारी रुखवत करून पाठवणीची तयारी केली आहे.
गौरीपूजन 2020 |
गौरी पूजना दिवशी गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य केला जातो.यामध्ये पुरणपोळी, पुरी, बासुंदी, श्रीखंड, कुरवड्या, भजी ईत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.शेजापाजारच्या सुवासिनींना हळदीकुंकूला बोलावलं जातं.वेगवेगळ्या संस्था गौराई च्या डेकोरेशनचे नंबर देखील काढतात. यासाठी सर्व महिला आपापल्या गौराईची नावनोंदणी देखील करतात.गौरी पूजनाच्या रात्री जागरण केलं जातं.गौराईची गाणी म्हंटली जातात.झिम्मा फुगडी खेळली जाते.फेर धरून सर्वजणी एकत्र रात्रभर गौराई ची गाणी म्हणतात.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जनाच्या दिवशी आळूवडी,धपाटी, दहीभाताचा नैवेद्य करून झाडपाल्याच्या गौराईचं पानोट्यावर विसर्जन करतात.बऱ्याच ठिकाणी सर्व मुली आणि सुवासिनी घोळक्याने गौराई ची गाणी म्हणत पानोट्यावर जातात आणि गौराई चं विसर्जन करतात.काही ठिकाणी गौराई बरोबर गणपती बाप्पाचं ही विसर्जन केलं जातं.
ज्यांच्या घरी बप्पाचं विसर्जन गौराई विसर्जना दिवशी केलं जात नाही त्या सर्वांच्या घरी अजून तोच उत्साह कायम असतो.कारण त्यांच्या घरी बाप्पाचा वावर अजून असतोच.सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती,वेगवेगळे प्रसादाचे पदार्थ हे सर्व अनंत चतुर्दशी पर्यंत खूप उत्साहात सुरूच असतं. आणि हा उत्साह अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाने ,त्याच्या निरोपाने संपन्न होतो.या उत्साहात खंड पडतो.
गौराई गणपती सणाच्या निमित्ताने तिच्या आणि सर्वच सुवासिनींच्या आनंदाला पारावार उरत नाही.तिचा उत्साह,तिची धावपळ,सर्व गोष्टी जमावण्याची तिची पळापळ ,गौराई सोबत तिचाही साज शृंगार, तिचं नटण मुरडनं याच्यातून तिला मिळणारा आनंद हे सगळंच खूप छान असतं. ह्या आपल्या पारंपरिक सणांच्या निमित्ताने मनात असणारा श्रद्धा भाव ,भक्तिभाव सर्वांचा सारखाच असतो.याच भक्तिभावाने आणि श्रद्धेनं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा गौरी गणपती सण साजरा केला जातो.
यावर्षी कोरोनाच्या महाविषाणूंमुळे सर्वच सणांचं आणि उत्सवाचं स्वरूप जरी बदललं असलं तरी भक्तिभाव तोच आहे.मनातील श्रध्दा किंचितही कमी झालेली नाही.जरी गौरी गणपती सणाला दरवर्षीप्रमाणे उत्सवाचं स्वरूप नसलं तरहीही या वर्षी हा सण साजरा करताना उत्साह मात्र दरवर्षी प्रमाणे तितकाच आनंद द्विगुणित करणारा आहे.
गौरीपूजन - 2020 |
हे पारंपरिक सण आपली संस्कृती आणि परंपरा म्हणून जरी साजरे केले जात असले तरी या सणाच्या निमित्ताने तिला मात्र रोजच्या व्यापातून,धावपळीच्या कामातून स्वतःसाठी , स्वतःला तयार करण्यासाठी,स्वतःचं मन जपण्यासाठी,नटण्यासाठी,मुरडण्यासाठी, तिच्या मैत्रिणी समवेत,चारचौघीत मिसळण्यासाठी आणि दोन तीन दिवसांसाठी का होईना तिचं थोडंफार जे काही दुःख असेल ते विसरण्यासाठी तसेच तिचा उत्साह आणि आनंद द्विगुणित होण्यासाठी तिच्या ह्या गौराई गणपती सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
3 Comments
लेख कसा वाटला जरूर कळवा.खाली कंमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.
ReplyDeleteNice👍
ReplyDeleteखूपच सुंदर लेख.फोटो गॅलरी खूप छान.गौरी सणाचं खूप छान वर्णन.
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏