गुजगोष्टी बाप्पाशी...,थोड्या भावनिक गप्पा बाप्पाशी


 गुजगोष्टी बाप्पाशी.....

थोड्या भावनिक गप्पा बाप्पाशी


भावनिक गप्पा बाप्पाशी

🙏🙏🌹🌹🙏🙏

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्नम कुरु मे देव  सर्वकार्येषु सर्वदा।



गणेश चतुर्थी निमित्ताने लिहिलेला हा लेख.कोरोना महामारी आणि लोकांच्या मनातील भीती आणि कोरोनाचं वाढतं संक्रमण यामुळे हताश असणारा संपूर्ण देश  थोडंस बाप्पाशी बोलून,त्याला साकडं घालून आपलं मन हलकं करत आहे.

गुजगोष्टी बाप्पाशी....थोड्या भावनिक गप्पा बाप्पाशी.....

थोडं वेगळं वाटत आहे ना? गुजगोष्टी आणि तेही बाप्पाशी?? आपण नेहमीच काही ना काही बाप्पाला मागत असतो.पण आजची ही परिस्थिती पाहता खरंच मला असं वाटलं, थोड्या गप्पा फक्त गप्पाच नाहीत तर भावनिक गाप्पा बाप्पाशी माराव्यात आणि भावनिक साकडं घालावं.

हे बाप्पा खरंतर आम्ही नेहमीच तुझ्याशी गप्पा मारत असतो.तू आम्हाला आमच्या घरातीलच एक सदस्य वाटतोस.आमच्यावर येणारं प्रत्येक संकट हे तू स्वतःवर घेतोस.तू विघ्नहर्ता आहेस.छोटं मोठं विघ्न तू समूळ नष्ट करतोस अशी आमची अढळ श्रध्दा आहे.खरं तर तू आमच्या पासून कधीच दूर जातच नाहीस,नेहमी आमच्यासोबत राहून आमचं संरक्षण करत असतोस.पण 11 दिवसासाठी मोठ्या उत्सवाच्या स्वरूपात तू गणेश चथुर्ती दिवशी आमच्या घरी येतोस आणि सोबत आनंदही घेऊन येतोस.

तसं तू नेहमीच आमच्या घरात,आमच्या मनात,आमच्या हृदयात असतोस.तुझ्या येण्यानं संपूर्ण देशभर बाप्पा मोरया चा गजर घुमत असतो.ढोल ताशांच्या गजरात तुला अगदी वाजत गाजत घरी आणलं जातं.बाप्पा मोरयाचा गजर सगळीकडे दुमदुमत असतो.अगदी छोटी छोटी मुलं जी नुकतीच बोलायला लागले ते सुद्धा त्यांच्या बोबड्या आवाजात "गणपती बाप्पा मोलया" असं म्हणून तुझ्या नावाचा जयघोष करत असतात.फक्त आपला देशच नाही तर परदेशातही तुझे भक्त अतिशय हर्षोल्हासात भक्ती भावाने तुझी पूजा, अर्चना करत असतात.

सार्वत्रिक गणेशोत्सव साजरा करण्याचाही एक इतिहास आहे.स्वातंत्र्य लढ्यात जनजागृती व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्व काळात  सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.ही तुझी उत्सवाची परंपरा खूप वर्षाची आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाले ,देश स्वतंत्र झाला.देशावरचं गुलामगिरीचं संकट दूर झालं. देश गुलामगिरीतुन मुक्त झाला आणि त्या दिवसापासून आजतागायत तुझ्या सेवेत,तुझ्या उत्सवात कधीही खंड पडला नाही.

यावर्षी मात्र तुझ्या इतक्या वर्षाच्या परंपरेत खंड पडला.ना पारंपरिक मिरवणुका , ना ढोलताशांचा गजर,ना गालिचे ना रांगोळ्या.कुठल्याच प्रकारचा सोहळा नाही.अगदी शांत वातावरणात पण तितक्याच उत्साहात लोकं तुला घरी घेऊन येत आहेत.भक्तिभाव तोच आहे  मात्र तरीही खूप सुनं सुनं वाटत आहे.आज आम्ही खूप हतबल झालो आहोत. आज तुला खूप साधेपणानं घरी आणताना कुठंतरी चुकल्या सारखं वाटत आहे मात्र यामुळे तुझ्यावरची श्रद्धा किंचितही कमी झालेली नाही.

याचं कारण म्हणजे आज संपुर्ण देशावर,जगावर कोरोनाचं सावट आहे.त्या महाभयंकर विषाणूचं संकट तुझ्या महाउत्सवावर आलेलं आहे.तुझ्या परंपरेला या महाविषाणूची नजर,त्याची दृष्ट लागली आहे.इतक्या वर्षांत पहिल्यांदाच केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांना तुझ्या उत्सवासाठी आणि तुला घरी आणण्यासाठी नियमावली सादर करावी लागली.या नियमावलीचं पालन करूनच लोकांनी तुझ्या आगमनाचं स्वागत केलं.

मनातून खूप दुःख होत होतं मात्र त्या महाभयंकर विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी आम्हाला अगदी मनावर दगड ठेऊन हे करावं लागत होतं.तुला घरी आणताना पहिल्यांदाच तोंडाला मास्क लावावा लागला आणि हाताला सॅनिटायजर लावावा लागला.तुझ्या नावाचा जयघोष करताना पहिल्यांदाच आमचं तोंड बंद होतं.मुखातून मात्र "गणपती बाप्पा मोरया " असा जयघोष सुरूच होता.

तुझ्या महाउत्सवात अनेकांना त्यांची रोजीरोटी कमाविण्याची संधी मिळते.मूर्तिकार तुझ्या मनमोहक व सुबक मूर्त्या बनवून त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह करतात. तुझं रूप,तुझी मूर्ती अजूनच सुंदर दिसावी यासाठी खूप मोठी आरास केली जाते.या आरासेसाठी लागणारं डेकोरेशन चं साहित्य बाजारात मिळते.बाजारपेठ अगदी डेकोरेशन च्या साहित्याने फुलून गेलेल्या असतात.मात्र यावर्षी याच बाजारपेठा सुन्या सुन्या वाटत होत्या.या परिस्थितीत मुळं व्यवसायिकांना देखील खूप नुकसान सोसावं लागलं.

कित्येक कोविड योद्धे मारणाचं सावट घेऊन जगतायत.कित्येक निष्पाप जीवांचा बळी या कोरोनाने घेतला.कित्येक लोकांच्या पोटापाण्याचे हाल हाल झाले,कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या.कित्येकांचे व्यवसाय बुडाले.या कोरोनाने,या महाभयंकर विषाणूने सर्वानाच हतबल करून सोडलं आहे.

हे विघ्नहर्ता, हे लंबोदरा, हे विनायका  "आमचं काय चुकलं आहे का"?.  तू  "रागावला आहेस का आमच्यावर" ?  तुला तर काहीच सांगावं लागत नाही.तुझी कृपादृष्टी आणि तुझी नजर संपूर्ण जगावर असते,मग आता जे काही चाललं आहे,जी महाभयंकर परिस्थिती आम्हा सर्वांवर ओढवली आहे ती दिसत नाही का रे तुला? लोकांचे होणारे हाल,लोकांच्या मनात कोरोनाची आणि कोरोनामुळे ओढवलं जाणारं मरण या सर्वांचीच असणारी भीती तुला जाणवत नाही का रे ? 

तू सर्व विद्यांचा अधिनायक,तू सर्व कलांचा अधिनायक.तू बुद्धीचा अधिष्ठाता आणि विघ्नांचा नियंत्रक विघ्नाधिपती आहेस.तूच परब्रह्मचे प्रतिक आहेस.तूच गणांचा पती गणपती आहेस.पाऊला पाऊलावर आम्ही तुला साकडं घालत असतो.आज तर मनोमनी तुझ्या लाखो करोडो भक्तांनी तुला साकडं घातलं असेल.ही विदारक परिस्थिती लवकरच नाहीशी होऊ दे आणि पुन्हा पहिल्यासारखं हसतं खेळतं ,आनंदी ,चिंतामुक्त वातावरण निर्माण  होऊ दे.

आमच्या वर आलेली ही कोरोनाची ईडापिडा लवकरच टळू दे आणि पुन्हा सुखाचं, समृद्धीचं,आनंदाचं,बळीराजाचं राज्य येऊ दे.पुन्हा नव उमेदीने,हर्षोल्हासात तुझी आरास, तुझं स्वागत, तुझा महाउत्सव साजरा करण्यासाठी आणि नवचेतना जागृत करण्यासाठी तुझं संकटमोशन करणारं अस्त्र बाहेर काढ आणि हे विघ्न हरण कर.आम्हा सर्वांवर आलेलं संकट नाहीसं कर.तुझ्या चमत्काराची महिमा सकल जनांस दाखव.आपला देशच नव्हे तर संपूर्ण जगाला तुझ्या कृपादृष्टीचं दर्शन घडू दे हीच तुला प्रार्थना ,हीच तुला आर्त विनंती.

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता,
तूच करता आणि करविता
मोरया,मोरया मंगलमूर्ती मोरया।।
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏




लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185

Post a Comment

1 Comments

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏