संघर्षाला साथ जिद्दीची

 संघर्षाला साथ जिद्दीची

संघर्षावर मात ,संघर्षाला साथ जिद्दीची, एस एस सी  सत्कार समारंभ
एस एस सी  सत्कार समारंभ

काल 10वी चा निकाल लागला आणि  तिच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही.तिला आकाश अगदी ठेंगणं झालं होतं.मोबाईल वर परीक्षा नंबर टाकून निकाल ओपन होईपर्यंत अक्षरशः तिच्या आईने डोळे बंद करून घेतले होते आणि मुलीचे हात घट्ट पकडून ठेवले होते.निकाल जसा ओपन झाला आणि त्यांची मुलगी जशी मोठयाने ओरडली ,"आई  97.20% मिळाले ", असं म्हणताच  तिच्या आईने डोळे उघडले आणि उघडलेल्या डोळ्यातून आपोआपच आनंदाश्रू वाहू लागले.त्या क्षणभर स्तब्ध झाल्या आणि या आनंदाश्रू च्या थेंबा थेंबा सोबत या आनंदी क्षणाच्या पाठीमागे असणारा संघर्ष त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला अन त्यांचे अश्रू थांबेनातच.मायलेकींचा कालचा जगण्यातला संघर्ष हा आज त्यांच्यासमोर यशाच्या स्वरूपात उभा राहिला होता.

हो  खूप मोठा संघर्ष. हा संघर्ष आहे कु.तन्वी विकास पाटील  रा.कामेरी,ता.वाळवा,जि. सांगली हिचा.खरं तर संघर्ष फक्त तन्वी चा नव्हता तिच्यासोबत तिच्या आईचा आणि तिच्या बाबांचा ही होता.तिच्या आईबाबांचा संसार खूप आनंदात सुरू झाला होता.मात्र म्हणतात ना,सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागते.अगदी तसंच झालं.तन्वीच्या आणि तिच्या भावाच्या जन्मानंतर काही दिवसातच तिच्या बाबांची तब्बेत बिघडायला लागली.

खूप औषध पाणी केलं.हळू हळू तब्बेतीमध्ये फरक पडतोय असं वाटायला लागतं न लागतं तोच पुन्हा नव्याने त्रास सुरू होतो.त्यांचा हा त्रास अनुवांशिक होता.त्यामुळे चार सहा महिने गेले की त्यांना पुन्हा त्रास सुरू व्हायचा.तिच्या आईनं हे वेळीच ओळखलं आणि संसाराची सगळी जबादारी स्वतःवर घेतली.तिचे बाबा जेव्हा ठीक असतात तेंव्हा भरपूर काम करतात आणि संसारासाठी आणि पोरांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करतात.मात्र त्यांची तब्बेत बिघडली की कमावलेला पैसा दवाखान्याच्या खर्चासाठी वापरावा लागतो.त्यामुळे सतत आर्थिक चणचण भासत राहते.मात्र तिची आई या परिस्थितीत न खचता अगदी धीराने आणि मोठ्या जबाबदारीने सर्व गोष्टी सांभाळून घेते.यासाठी ती छोटीमोठी नोकरी करून आर्थिक बाजू सांभाळते.

तिची आई मात्र खूप जिद्दी होती.तिनं मनाशी ठाम निर्धार केला होता.परिस्थिती कशीही असो मी माझ्या मुलांना खूप शिकवणार.आज मला कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र उद्या हीच माझी ताकद असेल.तन्वी अगदी लहानपणापासूनच हुशार होती.प्रत्येक वर्गात ती नंबर काढायची.परीक्षा कोणतीही असो ती काही केल्या नंबर सोडायची नाही.तिची ही उल्लेखनीय प्रगती पाहून तिच्या आईचं दुःख, त्रास,कंटाळा कुठल्या कुठे पळून जायचा.बाबांनाही तिचा अभिमान वाटायचा.

तन्वीला आपल्या घरचं वातावरण आणि आपली आर्थिक परिस्थिती याची जाणीव अगदी लहानपणापासूनच होती.बुद्धिमत्ता भरपूर होती मात्र वेळोवेळी शालोपयोगी वस्तू व शाळेला येण्याजाण्या साठी येणारा खर्च यासाठीही पैसे नसायचे.त्यामुळे तिची आई शाळेतील शिक्षकांना भेटून विनंती करायची.फी भरण्यासाठी लागणारी मुदत वाढवून घ्यायची.ती हुशार असल्याने शाळेतील शिक्षक ही तिला हरप्रकारे मदत करायचे.हुशार आणि होतकरू विद्यार्थिनींच नुकसान कोणतीही शाळा कधीच करत नाही.तिच्या शाळेतील शिक्षकांनी देखील तिचं पैसे नाहीत म्हणून कधीच नुकसान नाही केलं.याउलट ते नेहमी तिला प्रोत्साहन देत होते.वेळोवेळी तिचं मार्गदर्शन करायचे.खूप छान शाळा आणि शिक्षक तिला लाभले.

'निंदकाचे घर असावे शेजारी' असं आपण नेहमी म्हणतो अगदी तसंच तन्वी आणि तिच्या आईच्या बाबतीत ही होत होतं. परिस्थितीपुढं हतबल न होता परिस्थितीशी चार हात करून तिनं मोठया जिद्दीने पोरांना शिकविण्यासाठी रात्रीचा दिवस केला.असेच निंदक तिलाही आणि तिच्या आईलाही नको नको ते बोलायचे."शिकून आता मोठी बॅरिस्टरीन होणार ,कलेक्टरीन होणार " वगैरे  वगैरे.

तन्वीने मात्र मनाशी  निर्धार पक्का केला होता.कलेक्टरीन, बॅरिस्टरीन ह्या पुढच्या गोष्टी आहेत मात्र या वर्षी 10वी च्या बोर्ड परिक्षेला 95% मार्क्स पाडून सर्वांचं तोंड बंद करेन.हेच ध्येय उराशी बाळगून 10वीच्या अगदी पहिल्या दिवसापासून तिनं अभ्यासाला सुरुवात केली.तिची स्पर्धा ही दुसऱ्या कुणाशी नव्हती तर ती स्वतःशीच होती.त्यामुळे प्रत्येक परीक्षेत तिची प्रगती सर्वोत्तम होत चालली होती.तिला तिच्या आईची तिच्यासाठी चाललेली धडपड दिसत होती.त्यामुळे ती सुसाट सुटलेल्या वाऱ्याप्रमाणे पुढे चालली होती.ती थांबलीच नाही.

"एवढं मात्र नक्की आहे निंदकांमुळें ईर्षा निर्माण होते तर मार्गदर्शन करणाऱ्यांमुळे प्रोत्साहन मिळते"आणि अगदी तसंच झालं.तो दिवस उजाडला व निकाल आला.आईबाबांचा आणि तन्वीचा आनंद गगनात मावेनासा झाला.तिला 97.20% मार्क्स मिळाले आणि ती शाळेत सर्व मुलांत पहिली आली.गणित विषयामध्ये तर तीने 100 पैकी 100 गुण मिळविले.आणि दुसरी विशेष आणि अतिउल्लेखनिय गोष्ट म्हणजे इंग्लिश सारखा विषय जो भल्याभल्याना अतिशय अवघड वाटतो अशा विषयात तिने 100 पैकी 97 गुण मिळविले.अशाप्रकारे तिने जे ठरवलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त मार्क्स मिळवुन सर्वांचं तोंड बंद केलं.

ज्यांना ज्यांना तन्वीचा निकाल समजला त्यांचे फोन येऊ लागले,मेसेज येऊ लागले.शाळेतील शिक्षक,जवळचे नातेवाईक,राजकारणी आणि समाजकारणी या सर्वांची रेलचेल तिचं अभिनंदन करण्यासाठी आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी सुरू झाली.शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच तिनं तिचं पुढचं धेय ही ठरवलं.ते ध्येय गाठण्यासाठी काय करावं लागेल,कोणत्या कोर्स ला प्रवेश घ्यावा,कशाप्रकारे तयारी करावी या सर्व गोष्टीचं नियोजन देखील तिनं सुरू केलं.

तिचा झालेला सत्कार,आणि शुभेच्छाचा वर्षाव यामुळे तीने हुरळून न जाता लगेच पुढच्या गोष्टींचं नियोजन करायला सुरुवात केली.याला म्हणतात जिद्द.याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात महत्वकांक्षी आणि यालाच ध्येयवेडं म्हंटलं जातं. ध्येयवेडी लोकं कधीच थांबत नाहीत किंवा कोणत्या गोष्टींची वाट देखील बघत बसत नाहीत.ते रुळलेल्या वाटेवरून न चालता त्यांचा मार्ग स्वतः निवडतात.

10वी पर्यंत पोहचण्यासाठी आणि उचित ध्येय गाठण्यासाठी खूप संघर्षातून तिला जावं लागलं.तिच्या सोबत तिच्या आईबाबांचा देखील संघर्ष सुरू होता.मात्र या संघर्षाला तिच्या जिद्दीची साथ होती.तिच्या जिद्दीनं संघर्षाला माघार घ्यायला भाग पाडलं.

खरं तर यश हे कुणा एकट्याचं नसतं.ते मिळविणाऱ्या व्यक्तीच्या मागे हजारो हातांचं कष्ट असतं, त्यांच्या भावना जोडलेल्या असतात, त्यांचा त्याग दडलेला असतो.प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे हजारो हात तिचं मनोबल वाढविण्यासाठी सदैव तत्पर असतात.तन्वीच्या बाबतींत ही तसंच झालं.तिच्या ह्या यशात खासकरून तिचे तीन काका,काकू,आणि तिची सर्वच भावंडं ज्यांनी तिला तिच्या या संघर्षमय प्रवासात खूप मोलाचं योगदान दिलं. तिला पदोपदी मानसिक बळ दिलं. तिचं मनोबल कधीच खचून दिलं नाही.तसेच जवळचे सर्वच नातेवाईक यांचाही खूप मोलाचा सहभाग आहे.प्रत्येकाने आपापल्या परीनं योगदान दिलं आहे.

पण हा संघर्ष इथेच संपणार नाही.संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची ताकद असते.तिच्या आयुष्यात संघर्ष खूप लहान वयातच सुरू झाला त्यामुळे तीने संघर्षाला आता सह प्रवाशी बनवलं आहे.एक दिवस हाच संघर्ष तिची उद्याची ताकद बनणार आहे.

तन्वीला यूपीएससी परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचं आहे.आता तिचं ध्येय आयएएस ऑफीसर बनायचं आहे.प्रतिकूल परिस्थितीत राहून जी मुलगी 10वी ला एवढी उत्तम प्रगती दाखवत असेल तर त्या मुलीसाठी यूपीएससीचं टार्गेट गाठणं काही अवघड नाही.

तन्वीने जे स्वप्न जे ध्येय उराशी बाळगलं आहे ते तिला झोपेमध्ये पडणारं नसून तिची झोप उडवणारं आहे.भलेही ती आत्ता वयाने लहान आहे मात्र तिचं ध्येय, तिचं स्वप्न खूप मोठं आहे.आत्ता तिच्यासाठी ते डोंगरावढं मोठं जरी दिसत असलं तरी तीच्या जिद्दी स्वभावामुळे,चिकाटी वृत्तीमुळे, कष्ट करण्याच्या तयारीमुळे तसेच सकारात्मक दृष्टिकोणामुळे आणि मुख्य म्हणजे घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे एक दिवस नक्कीच तिच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी घेऊन येईल.


तिच्या भावी वाटचालीसाठी आणि आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹


लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185


Post a Comment

4 Comments

  1. तुमच्या प्रतिक्रिया जरूर सांगा.आणि सर्व विद्यार्थ्यांना लेख शेअर करा.अशा वाचनातून मुलांना प्रोत्साहन मिळतं.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद मँडम(दिदी).आज हा लेख वाचून खूप खूप आनंद झाला. ह्या मुळे मला माझ्या स्वपनाकडे जाण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळाले. दिदी तुझ्या मध्ये मला आणखी एक गुरु भेटला. मनापासून खूप खूप धन्यवाद.

      Delete
  2. तन्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,
    मंजिल उन्हीको को मिलती है
    जिनके सपनौ में जान होती है
    पंख सें कुछ नहीं होता
    हौसलों सें उडाण होती है।।

    ReplyDelete
  3. Congratulations Tanvi and her proud parents 💐💐

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏