व्यथा दमलेल्या शेतकऱ्यांची
😥😥
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा
|
आठ दिवस झालं पाऊस धो धो पडायला लागला.बऱ्याच नदीकाठच्या गावामध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.मुळातच पाऊस खूप उशिरा सुरू झाला.मृग नक्षत्रावर सुरुवातीला बऱ्यांपैकी खरिपाच्या पेरण्या झाल्या.पेरण्या केल्या आणि चार दिवसातच पाऊस राम राम करून निघून गेला.पेरलेलं बियाणं उगवून येईल की नाही ह्या चिंतेत बळीराजा होता. पिकांना ऊन सहन होईना.विहिरीचं पाणी पुरेसं शेताला मिळेना.त्यामुळे बियाणं उगवून येण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली.त्याच्यातच हुमन्या म्हणजे शेतातले किडे,मोर,लांडोर,वानर ही रानातली जमात पेरलेलं बियाणं फस्त करू लागल्या.आता यातून वर यायचं कसं ह्या विचारात शेतकरी राजा असतानाच अजून एक संकट येऊन उभं ठाकलं ते म्हणजे पेरलेलं बियानंच नकली आहे असं समजलं आणि शेतकऱ्याच्या समोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला.बियाणं दुबार पेरण्याचं संकट उभं राहिलं.शेतीसाठी पुन्हा दुबार खर्च घालण्याचं संकट निर्माण झालं. मार्च महिन्यापासून अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळं कुठं बाहेर पडणं मुश्कील झालं होतं.त्या महाभयंकर विषाणूची बाधा होऊ नये,संसर्ग होऊ नये म्हणून घरातून बाहेर पडणं बंद केलं होतं.त्या कोरोनाच्या काळजी पेक्षा आजा-बीजारी पडलो तर त्याला पैसा आणि कुठून आणायचा ह्या काळजीनं खरंतर शेतकरी राजा घर आणि शेत एवढंच करत होता.पण या कोरोना मुळं आमचं हाल हाल झालं या काही महिन्यात. पहिले दोन महिने तर शेतकऱ्याचं शेतातलं माळवं अक्षरशः लॉकडाऊन मुळं शेतातच पडून राहिलं.माळव्याच्या बियानाचा खर्च,खत-लागवडीचा खर्च,कीड लागू नये म्हणून औषध पाण्याचा खर्च,भांगलणीचा खर्च एवढं सगळं शेतकऱ्याच्या माथी पडलं. लॉकडाऊन मुळं शेतातला माल शेतातच राहिला.अक्षरशः छोट्या मोठ्या सगळ्याच शेतकऱ्यांचा माल शेतातच कुजून गेला.निसर्ग कधी साथ देतो कधी त्याचा प्रकोप दाखवतो त्यातच हा कोरोना आमच्या बोकांडीवर येऊन बसला होता.आमची आवस्था जगावं की मरावं अशी झाली होती. हे झालं शेताचं आणि शेतातील मलाचं पण एवढ्यावरच आमचं नुकसान थांबलं नाही.दूध दुपत्याची जनावरं आम्ही पाळतो.त्यांच्यापासून मिळणारं दूध आम्ही विकतो बदल्यात आम्हाला आठवड्याला पैसे मिळतात त्या पैशात आमचा आठवड्याचा खर्च निघतो.पण ह्या कोरोनाच्या काळात दुधाचंही खूप नुकसान झालं.आमचं येणं सगळं बंद झालं.खर्च मात्र थांबत नव्हता.पोटाची खळगी भरायची कशी याच काळजीत आम्ही जास्त होतो.रोजमारीच्या जगण्यापुढे कोरोनाची भीती आणि काळजी कुठल्या कोपऱ्यात दडून बसली हे आमचं आम्हालाच कळलं नाही. टीव्ही वर बातम्या ऐकत होतो कंपन्या बंद झाल्या,सरकारी खाजगी कार्यालये बंद झाली.नोकरदारांचं सगळं अवघड झालं,पगार पाणी नाही कामावर परत बोलावतील की नाही ह्या चिंतेत असणारा नोकरदार वर्ग आणि त्यामुळे कशी सगळी घडीच विस्कळीत झाली याविषयी टीव्ही वर बरंच पाहिलं.पण आमचं दुखणं कुणालाच दिसलं नाही.नोकरदार वर्ग जो घरात बसून होता त्यांना मार्केटमध्ये भाजीपाला उपलब्ध नाही ह्या बातम्या खूप पाहिल्या पण त्याच भाज्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही इकडं जिव्हाचं रान करतो ते कुणी नाही दाखवलं. तुम्ही आम्हाला "जगाचा पोशिंदा " म्हणता मग या कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत तोच पोशिंदा कुठल्या चिंतेत जगतोय हे कुणी नाही दाखवलं.हळूहळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली.भाजीपाला अत्यावश्यक सेवेमध्ये येतात त्यामुळे ते विकण्याची परवानगी शेतकऱ्यांना मिळाली.भाजीपाला शेतात केला की रोजचा ताजा पैसा हातात येतो आणि त्यामुळे रोजचा खर्च भागतो.मात्र हाच रोजचा ताजा पैसा आमच्या हातात येण्यासाठी किती हात पाय झिजवतो हे आमचं आम्हालाच माहीत आहे.
|
आमच्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही.मोठ्या मार्केट ला व्यापारी आमचा 50 रुपयेचा माल 20 रुपयेलाच मागतात आणि 60 ते 70 रुपयेला विकतात.आणि तुमच्यासारखे जे पॅकेज मध्ये पगार घेतात ते तुम्ही माल विकत घेताना 50 रुपयेचा माल 30 रुपयेला 40 रुपयेला मागता.एवढ्या कष्टाने ऊन वारा पाऊस झेलून तुमच्यापर्यंत अगदी निवडून आणलेला माल जेव्हा तुम्ही पाडून मागता तेव्हा मनाला खूप यातना होतात.तुम्ही लोकं 20 रुपयेचे पॉपकॉर्न सिनेमागृहात गेल्यावर 200 रुपयेला घेता आणि इकडे 10 रुपयेची मेथीची जुडी 5 रुपये मध्ये मागता.हे पाहून फार वाईट वाटतं.
याहीपेक्षा वाईट ह्या गोष्टींचं वाटतं जेंव्हा याच भाज्या तुम्ही मॉल मधून विकत घेता तेव्हा 10 रुपयेच्या भाजीला 50 रुपये देता हे तुमचं "स्टॅंडर्ड ऑफ लिविंग". शेतात राब राब राबून पिकवलेलं माळवं कवडीमोल भावानं विकताना आम्हला किती त्रास होत असेल याची तुम्ही कल्पना नाही करू शकत.
कधीकधी शेतातून पिकलेल्या धान्यापासून आणि भाजीपाल्यापासून आम्हाला आमचा घातलेला खर्च सुद्धा काढता येत नाही.आमचं कितीही नुकसान झालं म्हणून आम्ही हार मानत नाही.आम्ही पुन्हा नव्यानं उभं राहतो.पुन्हा त्याच जोशानं आणि नवउमेदीनं पुन्हा शेतात पेरतो.आम्ही खूप आशावादी आहोत.निसर्ग आम्हाला धोखा देईल,वरूण राजा साथ देईल की नाही याची आम्हाला अजिबात खात्री नसते तरीही यावर्षी पाऊस चांगला पडेल आणि पिकं जोरात येतील याच आशेवर पुन्हा नव्याने पेरण्या करतो.पुन्हा कर्ज काढतो आणि शेतीसाठी बी-बीयाने आणि खते खरेदी करण्यासाठी पैसे वापरतो हेच सुरू असतं आमचं वर्षानुवर्ष.कर्ज काढा आणि शेताला घाला.शेतात पिकलं तर चार रुपये मिळतात नाही पिकलं की झाला हंगाम पडलं कर्ज डोक्यावर अशी आमची गत असते.
आम्ही सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असतो.आम्हाला आमची पोटं भरण्यासाठी आमची पिकं जोमात यावी लागतात. मात्र याच आमच्या पिकांना कधी कडक सुका दुष्काळ जाळून टाकतो तर कधी धोधो पडणाऱ्या पाण्यानं असलेलं सगळं कुजवून टाकतो.हे त्रास कमी आहेत म्हणून कोरोना सारखी महामारी आली आणि आमचं दोन महिन्यात आलेलं सगळंच बाजाराविन शेतातच कुजून गेलं.
निसर्ग आम्हाला कधी त्याच्या छत्रछायेखाली घेईल आणि कधी पाण्याबरोबर ,महापूराबरोबर सगळं वाहून नेईल याची आम्हाला अजिबात कल्पना नसते.सगळंच बेभरवशाचं असून सुद्धा कधी नशिबाला दोष देत नाही किंवा निसर्गाला कोसत बसत नाही आम्ही.एवढं सगळं सहन करायला लागतं आम्हाला म्हणून आम्ही जगायचं थांबत नाही.आशा सोडत नाही.रोज राब राब राबतो.मरमर मरतो आणि काळ्या आईच्या उदरातून सोनं पिकवण्यासाठी धडपडतो आणि पिकवतोही.
एक मात्र नक्की आहे,परिस्थिती कशीही असो, आम्हाला खायला अन्न का नसेना, तरीही आम्ही ते दुःख कवटाळून जास्त काळ कधीच बसत नाही.पुन्हा नव्याने तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त कष्ट करायला सुरुवात करतो.
कितीही कष्ट वेचलं किंवा कितीही दुःख असलं तरी आम्हाला भूख लागण्यासाठी कुठल्याही टॉनिक ची गरज लागत नाही आणि झोप लागण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज भासत नाही.अंथरुणावर पडलं रे पडलं की आमची झोप लागते.भलेही डोक्यावर कितीही कर्ज असो, डोक्यात हजारो प्रश्न असो किंवा कितीही मोठं दुःख असो.
आमचं फुललेलं हिरवंगार शेतच आमचं टॉनिक आहे आणि ते पाहून भरलेलं मन आमची ऊर्जा आहे, प्रेरणा आहे.
लेखन,
प्रा.डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप--9511775185
6 Comments
कृपया तुमच्या प्रतिक्रिया कळवा
ReplyDeleteशेतकरी जीवन मॅडम आपण सत्यात उतरवलं.खूप सूंदर लेख
ReplyDeleteखूपच छान लिखाण 💐
ReplyDelete👌
ReplyDeleteSalam shetkri bandhavanna🙏🙏👍
ReplyDeleteHardwork ky ast te tumchya sarkya shetkari lokankadun shikun ghya......
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏