माझा आधारस्तंभ माझे वडील




 माझा आधारस्तंभ माझे वडील





माझा आधारस्तंभ माझे  वडील आमचे अण्णा.खरंतर प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आपल्या वडिलांना पप्पा, अप्पा,बाबा अशा वेगवेगळ्या नावाने बोलावतात.आमचे अण्णा माझाच नाही तर आमच्या घराचा आधारस्तंभ आहेत.आज मी जे काही थोडं फार यश मिळवलं आहे,छोटीशी का होईना समाजामध्ये एक ओळख निर्माण केली आहे ते सर्व अण्णांच्या पुण्याई मुळे आणि त्यांनी केलेल्या संस्कारामुळे शक्य झाले आहे.

माझं भाग्य थोर म्हणूनच आज अभिमानाने सांगू शकते की,आम्ही अशा वडिलांची मुलं आहोत ज्यांनी आपलं आयुष्य आमच्यासाठी खर्ची घातलं.आम्हाला संस्कार दिले.आम्हाला शिक्षण दिलं.आम्हाला आमच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनविलं.समाजात मानानं आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं. 

अशाच एका वडिलांची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे.गोष्ट तशी खूप जुनी आहे.

एका गावात एक कुटूंब राहत होतं. वडील शेती करत होते,तर आई घरकाम करत होती.त्यांना दोन मुलं होती.दोघेही शिक्षण घेत होती.या दोन्ही मुलांना त्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेले होतं. मोठा मुलगा शिक्षणामध्ये जेमतेम होता मात्र छोटा फार हुशार होता.घरची गरिबी व दोघांच्या शिक्षणाचा खर्च पेलत नव्हता त्यामुळे मोठ्या मुलाने आपलं शिक्षण सोडून देतो व छोट्या भावाच्या शिक्षणासाठी स्वतः लक्ष देतो असा प्रश्न केला.मात्र वडील म्हणाले 'बाळा,मी जरी शिकलो नाही तरी तुम्हा दोघांना माझ्यासारखी परिस्थिती येऊ देणार नाही.तुम्हा दोघांना खूप शिकवणार.खूप मोठं करणार.भले आपली परिस्थिती कशीही असो मी यातून मार्ग काढेन पण तुमचं शिक्षण मी थांबवू देणार नाही.

संपूर्ण जगाला पोसायची ताकद असणाऱ्या या जगाच्या पोशिंद्याला स्वतःचं कुटुंब सांभाळताना आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करता करता किती आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागतं याचा अंदाज न बांधलेलाच बरा!. माझे वडील शेतकरी आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असे सुद्धा म्हणायला भाग्य लागतं.

बघता बघता आम्ही दोघे मोठे झालो.शिक्षणाचा खर्च अजूनच वाढत गेला.वडील खूप जिद्दी होते त्यामुळे त्यांनी हार कधी माणलीच नाही.मुलांना शिकवून मोठं करायचं हे त्यांचं ध्येय होत.रोज शेतात घाम गाळत होते आणि शेतातून धान्याच्या रूपानं मोती पिकवत होते.वडिलांनी गाळलेल्या घामाची आणि शेतात पिकलेल्या मोत्याची किंमत करोडो रुपये मोजले तरी होणार नाही.कष्टासोबतच त्यांचा दृढनिश्चय जोडला होता त्यामुळे कष्ट करताना त्यांना त्रास कधीच झाला नाही.त्यांच्या कष्टामध्ये मुलांचं भविष्य आणि भवितव्य दोन्ही दडलं होतं.

आम्ही आता कॉलेज ला जायला लागलो.शिक्षणासाठी आम्हा दोघांना बाहेर गावी ठेवलं होतं.दोघांच्या शिक्षणाचा कॉलेजचा खर्च ट्यूशनचा खर्च,बाहेर गावी राहण्याचा खर्च,खाण्यापिण्याचा खर्च या सर्वांची जुळवाजुळव करता करता आमचे वडील थकून जायचे.कधी कधी पैश्याची जुळणी नाही व्हायची.मग आजचं काम उद्यावर ढकलून वडील पुन्हा शेतावर जायचे.खूप विचार करायचे त्यांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवायचे.

वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती.ते खूप हुशारही होते शाळेमध्ये.त्या काळात त्यांना पाच पाच किलोमीटर प्रवास करून शाळेला जावं लागायचं.हुशार असल्याने त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना शिकवून मोठं करायचं असं ठरवलं होतं.मात्र ठरवलेलं सगळंच पूर्ण होतं असं नाही होत.त्यांच्या वडिलांची म्हणजेच माझ्या आजोबांची तब्बेत बिघडली आणि त्यातच ते वडिलांना सोडून निघून गेले.वडील घरात मोठे होते त्यामुळे साहजिकच घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि त्यांना शिक्षण मध्येच सोडून द्यावं लागलं.वडिलांना ह्या गोष्टी आठवल्या की फार त्रास व्हायचा.म्हणूनच त्यांनी त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मुलांच्या रुपात पूर्ण करायचं असा जणू चंग बांधला होता.

माझं शिक्षण पैशाअभावी मला सोडून द्यावं लागलं मात्र ही वेळ मी माझ्या मुलांच्यावर कधीच येऊ देणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं.शेतीवाडीत कष्ट करण्यासाठी बैलांची जोडी देखील होती.पैसे कमी पडले तर थोडं शेत विकून आणि त्यातून मिळणाऱ्या पैशात मुलांची शिक्षणाची फी भारता येईल असं वडिलांनी नियोजन केलं होतं.

विकलेलं शेत पुन्हा परत मिळवता येईल मात्र माझ्या मुलांचं शिक्षणाचं नुकसान झालं तर ते कधीच भरून निघणार नाही आणि त्यांच्यावरही माझ्यासारखी वेळ येईल आणि असं मला कदापि होऊन द्यायचं नाही.माझ्याकडे आता जे काही आहे ते जर गमवावं लागलं तर मला थोडं दुःख नक्कीच होईल  कारण ही सर्व शेतीवाडी वडिलोपार्जित आहे मात्र ही जपण्याच्या नादात मी माझ्या मुलांचं नुकसान नाही होऊ देणार.माझी मुलं नोकरीला लागली की  गेलेली शेतीवाडी पुन्हा मिळवतील.एवढं मोठं स्वप्न आणि एवढा अढळ विश्वास उराशी बाळगून वडिलांनी आम्हा दोघांना मोठं केलं,चांगलं शिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं.

माझे वडील खरंच खूप ग्रेट आहेत.उगाचच त्यांना आधारस्तंभ म्हणत नाहीत.वडीलांमुळे आयुष्यात एवढं समजलं की कोणतीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय भेटत नाही.मुलांचं भविष्य घडविण्यासाठी आमच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं.

आज त्यांच्याकडे पाहून मला एकच म्हणावसं वाटत आहे की, मलाही तुमच्यासारखंच एक जबाबदार,स्वाभिमानी, जिद्दी, ध्येयवेडा, आशावादी  आणि असंच मीही माझ्या मुलांचा आधारस्तंभ होण्यास लायक बनण्यासाठी ताकद मिळावी.


वडिलांच्या या जिद्दीला सलाम  
     'माझे आधारस्तंभ माझे वडील'





लेखण
मुकेश लाटे सर
सरस्वती विद्यालय, प्रकाश नगर लातूर.
मोबाईल-8087343415


Editor
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185



Post a Comment

10 Comments

  1. अप्रतिम लेख
    खूपच छान सरजी

    ReplyDelete
  2. मस्तच

    ReplyDelete
  3. प्रेरणादायी विचार असणारा लेख

    ReplyDelete
  4. खरंच छान. असंच वाचन आणि लेखन चालू ठेवा. हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  5. आपण माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याच्यासाठी मी सदैव ऋणी राहील.
    धन्यवाद सर्वांचे 🙏🙏

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏