कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या मनातील विचारांची दंगल
मार्च महिन्यापासून या कोरोनाने डोकं वर काढलं आणि लोकांना घरात बसायला भाग पाडलं.चीन,इटली आणि अमेरिका या देशांच्या कोरोनाच्या बातम्या येत होत्या.खूप महाभयंकर असा हा विषाणू आहे.याचा प्रसार खूप वेगाने आणि मानवी संक्रमणाने होत होता.या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कडकडित बंद पाळायचे आदेश दिले.बघता बघता पूर्ण देश बंद झाला.
शाळा व कॉलेज बंद झाले.सरकारी,खाजगी सर्वच कार्यालयं बंद झाली.बाहेरच्या देशातील कोरोना संक्रमणाच्या आणि मृतांच्या आकडेवारीच्या बातम्या बघून सर्वच लोकांना अगदी धडकी भरली होती.त्यामुळेच लोकांनी देश बंदला खूप चांगला प्रतिसाद दिला.बाहेरच्या देशांबरोबरच आता आपल्या देशाचे आकडे वाढायला सुरुवात झाली.सुरुवातीला मृत्युदर खूप कमी होता तरीही लोकांना धास्ती होती.
सुरुवातीच्या काळात बाहेरच्या देशातील मृतांचे आकडे पाहून तसेच मेलेल्या माणसांची विल्हेवाट कशाप्रकारे एखाद्या खोल खणलेल्या खड्ड्यात लावतात याचे व्हिडीओ पाहून सर्वांच्याच मनात खूप भीती बसली होती.सोशल मीडियावर अशाप्रकारच्या बातम्या खूप असायच्या.लहान मुलांना कशाप्रकारे श्वास घ्यायला त्रास होतो.ती छोटी चिमुरडी मुलं श्वास घेता येत नाही म्हणून घशाला हात लावून अक्षरशः लोळून लोळून आक्रोश करताना आपण अनेक व्हिडीओ मध्ये पाहीलं आहे.तसेच अंबुलन्स येईपर्यंत श्वास घ्यायचा प्रयत्न कर अशा सूचना लांबून देणारे पालक व श्वास घेता येत नाही म्हणून तलमळणारे तडफडणारे लहान मुले ही आपण पाहिली.
लहान मुलांना होणारा तो त्रास पाहून हृदयाचा थरकाप उडवायचा. आणि "मन चिंती ते वैरी ना चिंती" या उक्ती प्रमाणे आपली मुलं लगेच डोळ्यासमोर यायचीत.याच कारणाने खरं तर जास्त धास्ती घेतली होती.याचबरोबर मृतांचा अक्षरशः खच पडलेला पाहून आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या खोल खणलेल्या खड्यात त्या मृतांवर माती ओढली जायची हे पाहून मन सुन्न होऊन जायचं.आणि हे सर्व भीतीदायक आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी बहुतांश लोकांनी लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केलं.
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा जास्त धोखा आहे.मग यामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, मधुमेही पेशंट,रक्तदाबाचे पेशंट, हृदयविकाराचे पेशंट अशा सर्वच प्रकारच्या आणि सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा जास्त धोखा असल्या कारणाने या लोकांची योग्य ती काळजी घेतली जाऊ लागली.यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या सर्व करण्यात येत होत्या.यामध्ये प्रामुख्याने घरगुती उपाययोजना केल्या जात होत्या.
भारतीय लोकांना आलं वेलची मसाला घालून तसेच खूप दूध घालून केलेला एकदम कडक आणि फक्कड चहा घ्यायची सवय आहे.मात्र कोरोना मुळे कोरा चहा म्हणजेच ब्लॅकटी सुरू करावा लागला.कडक उन्हाळा असूनही जेवढं शक्य आहे तेवढं गरम पाणी प्यायला सुरू केलं.हळद दूध पिणं,गरम पाण्याची वाफ घेणं,प्राणायाम आणि योगासने करणं,थंडपेय,बाहेरचं तसेच बेकरीचं खाणं टाळणं हे सर्व उपाय करून झाले.
आता आपल्या देशातील कोरोना संक्रमणाचे आकडे हळू हळू लाखांच्या घरात जाऊन पोहचले.तसेच मृत्यूचे आकडे हजारांच्या घरात जाऊन पोहचले.आपल्या देशातील रोजचा मृत्युदर कमी होता मात्र कोरोना संक्रमणाचा दर खूप जास्त वाढत होता.कोरोना विषाणूने त्याचं एक जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात लोकांना अगदी अलगद ओढत होता.एकास दोन,दोनास चार,चारास आठ असं म्हणता म्हणता संपूर्ण देशाला आपल्या जाळ्यात ओढू पाहत होता.
तीन महिने होऊन गेले तरी कोरोना आटोक्यात यायची चिन्हं दिसत नव्हती.रोज आकडे वाढत होते.अँटिडोस अजूनही तयार झाला नव्हता.कोरोना पेशंटचा आकडा मात्र रोज हजारांच्या घरात वाढत होता.शाळा कॉलेज अजून बंदच होती.काही कार्यालय व कंपन्या हळू हळू सुरू करायला सरकारने परवानगी दिली.सरकारने लॉकडाऊन मध्ये थोडी शिथिलता आणल्या कारणाने लोकांचं रस्त्यावर फिरणं वाढलं.काही लोकं अशा आविर्भावात फिरत होती जणू कोरोना त्यांचा मित्रच आहे आणि मित्राच्या हातात हात घालून फिरत आहेत.याच कारणामुळे कोरोनाचं संक्रमण अधिकच वाढत गेलं.कोरोनाचं जाळं एवढं घट्ट झालं की त्यामध्ये रोज हजारो लोकं अगदी सहज अडकू लागले.अशी महाभयंकर वाढ होत होता बऱ्याच शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांना बेड ही उपलब्ध होत नव्हते आणि व्हेंटिलेटरही पुरत नव्हते.त्यामुळे पुणे व मुंबई या ठिकाणच्या कोरोना पेशंटचा मृत्युदर वाढत होता.
सरकारने आता खाजगी दवाखान्यांनाही कोरोना संक्रमित रुग्णांना सेवा देण्यासाठी मान्यता दिली होती.मग हळूहळू खाजगी दवाखान्यांचे कोरोना रुग्णांचे बिलाचे आकडे समजायला लागले.पुण्यात खाजगी दवाखान्यात कोरोनाची ट्रीटमेंट घेण्यासाठी कमीतकमी एक लाख वीस हजार खर्च होता तर जास्तीत जास्त साडेसात लाख खर्च होता.हे आकडे टिव्हीच्या बातम्यांमधून व लोकांच्याकडून ऐकण्यात येत होते.
हे अव्वाच्यासव्वा आकडे टिव्ही च्या बातम्यांना ऐकून काही सेकंदानमध्येच एक प्रश्न मनामध्ये घर करायचा,"की आपल्याला कोरोनाची लागण झाली तर हे असले अवाढव्य आकडे भरण्याची ऐपत आपली आहे का"? आणि याच भितीमुळे खरंतर कोरोना संक्रमनाअगोदरच कोरोनाच्या भीतीनं अर्धा मेलेला सर्वसामान्य माणूस ,खाजगी दवाखान्यांचे बिलाचे आकडे पाहून हार्टऍटॅकने मरणार नाही तरच नवल!.अशी अवस्था खरंतर झाली होती.
माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.अगदी प्रश्नांची दंगलच सुरू होती.एक म्हणजे कोरोना होऊ नये याची भीती,मुलाबाळांची व घरच्यांची काळजी त्यांना कोरोना पासून दूर ठेवायचं,कोरोनामुळे नोकरी बंद, व्यवसाय बंद, पगारपाणी नाही, केलेल्या कामाचा पगार नाही तर बंद असणाऱ्या कामाचा पगार कुठून मिळणार.सगळं सुरळीत होत नाही तोवर घरखर्च कसा चालवणार,घराचं भाडं कुठून देणार,कर्जाचे हाप्ते कसे भरणार आणि समजा कोरोना झाला तर दवाखाण्याचा खर्च कुठून आणि कसा भागवणार.असे एक ना अनेक हजार प्रश्न डोक्यात घर करून होते.
हे सर्व विचार,सर्व प्रश्न जणू डोक्यात एकमेकांशी दंगल खेळत होते.आणि या दंगलीमुळे खरंतर वेडं लागायची वेळ आली होती.सर्वात महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन नंतर संस्था,कंपनी आपल्याला पुन्हा कामावर बोलावणार का? असा एक नाही हजार प्रश्न डोक्यात घेऊन जगतोय सर्वसामान्य माणूस.कसं होणार आणि काय होणार? हे प्रश्न खरंतर गडगंज संपत्ती असणाऱ्याला कधी पडणारच नाहीत.
उच्चभ्रु लोकांना कोरोना मुळे काडीचाही फरक पडला नाही.अरे समुद्रातून एका नदीचं पाणी बाजूला काढलं तर समुद्राला काडीमात्रही फरक पडत नाही तसंच करोडपतींना चार महिने काय किंवा वर्षभर जरी काम बंद असेल तर तिळमात्रही फरक पडणार नाही. "थेंबे थेंबे तळे साचे" या उक्तीप्रमाणे आपण थोडं थोडं करून साठवतो आणि अशा संकटांमुळे आपलं मात्र डोंगरा एवढं नुकसान होतं.
इथं काही झालं तरी होरपळून मात्र सर्वसामान्यच निघतो.कोरोनानं एक तेवढं भारी केलं,त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचा भेदाभेद नाही.तो कुणालाच सोडत नाही.त्याच्यासाठी कोण जवळचा अन कोण परका असं काहीच नाही. तसेच त्याच्यासाठी उच्चनीच , गरिबश्रीमंत, लहानथोर ,मंत्री,आमदार,खाजदार असा कोणताच भेदभाव नाही.त्याच्यासाठी सर्व लोकं सारखीच आहेत.
खरंच किती वेडे आहोत आपण सर्वसामान्य लोकं!! पहा ना , कोरोनाच्या ट्रिटमेंट साठी ह्या मंत्र्यांना ' 5स्टार दवाखाना, आमदार खाजदार 5स्टार दवाखाना, गायक व अभिनेते 5स्टार दवाखाना' .
आणि आपण मात्र कोरोना झाला तर सरकारी दवाखान्यात जागा मिळेल का ?, ऑक्सिजन पुरेल का?, व्हेंटिलेटर मिळेल का ? या विचारांची रोज डोक्यात घुसमट घेऊन मानसिक तणावाखाली जगतोय.या खाजगी दवाखान्यांचे भले मोठे आकडे पाहून ब्लडप्रेशरचा,ह्रदय विकाराचा त्रास सुरू होऊन कोरोनाच्या संक्रमना अगोदर भीती मुळं, मानसिक तणावामुळे शारीरिक संतुलन बिघडण्याचा चान्स मात्र नक्कीच आहे.
शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आम्ही हजारों उपाय करून या महाभयंकर विषाणूला म्हणजेच कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यात यशस्वीही होऊ मात्र या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वसामान्यांची आर्थिक व्यवस्था कोलमडून पडली आहे ही आटोक्यात आणण्यासाठी मात्र त्याच्याकडे उपयोजना नाहीत.
आमच्या चंचल मनाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, मन सशक्त बनविण्यासाठी, मन निरोगी बनविण्यासाठी आमच्याकडे प्राणायाम व योगासने असे उपाय आहेत परंतु हे उपाय करून झाल्यानंतर पुढच्या दहाव्या मिनिटाला पुन्हा डोक्यात तेच प्रश्न पुन्हा घुमत राहतात या प्रश्नांचं काय करायचं !!.
आमच्या सर्वसामान्यांची आर्थिक आणि सामाजिक घडी सुरळीत होण्यासाठी या कोरोनाचं बस्तान उठणं गरजेचं आहे.कोरोनाचं बस्तान उठवण्यासाठी लॉकडाऊन करून त्याची साखळी तोडण्यास आपण यशस्वी होऊ पण मनातील विचारांचं काय करायचं ? मनात जी विचारांची दंगल सुरू आहे या विचारांना आपण लॉकडाऊन करू शकतो का ?
हो दंगलच, मुद्दामच हा शब्द घेतला आहे.कोरोना आल्यापासून या डोक्यात रोज नको नको ते विचार घेऊन जगतोय आम्ही.या विचारांना आम्ही थांबवूच शकत नाही.एकापेक्षा एक वरचढ विचार जणू डोक्यात युद्धच खेळत आहेत एकमेकांशी.याच विचारांच्या युद्धामुळे व दंगली मुळे आमची रोज घुसमट होत आहे आणि आमचं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे.
मनातील विचारांचा लॉकडाऊन तेंव्हाच उठेल जेंव्हा आपलं दैनंदिन कामकाज पूर्ववत होईल.अन्यथा संसाराचा गाडा हाकायचा कसा आणि आर्थिक नियोजन करायचं कसं याच्या विचारानेच 'मनाने मात्र' आम्ही रोज थोडं थोडं मरत जाऊ एवढं नक्की आहे!!!!
3 Comments
Ossum info👌
ReplyDeleteमस्त लेख आहे
ReplyDeleteSundar
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏