मानवंदना विरपुत्रांच्या शौर्याला
आपल्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन आलेला आजचा दिवळी सण त्या दोन परिवारात मात्र दुःख घेऊन आला.हा सण दिव्यांचा आहे.हा सण रोषणाईचा आहे.हा उत्सव नात्यांचा आहे.हा उत्सव अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा आहे.हा उत्सव नवचैतन्य निर्माण करण्याचा आहे.हा उत्सव म्हणजे दुःखावर सुखाची मात आहे.
संपुर्ण देशात उत्सव साजरा होत असताना , संपुर्ण देश रोषणाई मध्ये असताना, संपूर्ण देश नात्यांचा उत्सव साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील दोन कुटुंब मात्र काळ्याकुट्ट अंधारात गेली आहेत.
देशाच्या सीमेवरती आपलं कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण प्राप्त झालं.आपण सुरक्षित राहावं,आपण आनंद साजरा करावा,आपण दिवाळी सण उत्साहात साजरा करावा,संपूर्ण देशभर दिव्यांची रोषणाई व्हावी म्हणून सीमेवरती तटस्थ राहून ऊन,वीज,वारा,पाऊस नाही तर ह्या वीर जवानांनी आपल्या अंगावर बंदुकीच्या गोळ्या झेलून आपल्या प्राणाची आहुती दिली.आपल्या अमूल्य प्राणाचं बलिदान दिलं.
काश्मीर मध्ये शत्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने बेछूट गोळीबार केला.या हल्ल्याला प्रतिउत्तर देताना भारतीय सेनेचे तीन विरपुत्र धारातीर्थी पडले.शत्रूबरोबर दोन हात करताना देशसेवेचं व्रत हाती घेतलेले आपल्या महाराष्ट्राचे दोन जवान आपलं कर्तव्य बजावत असताना शाहिद झाले.त्यापैकी ऋषिकेश जोंधळे वय वर्ष 20 हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील तर भूषण रमेश सतई हे नागपूर मधील काटोल येथील या दोघांचा यामध्ये समावेश आहे.
वय वर्ष 20 आणि 25.खूप मोठी आणि असंख्य स्वप्न उराशी बाळगून हे विरपुत्र देशसेवेत रुजू झाले असतील.यांच्या स्वप्नांत त्यांच्या आईवडिलांची स्वप्न,त्यांच्या बहीण भावांची स्वप्न त्यांच्या स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्न आणि अशी बरीच स्वप्न असतील जी आज मातीमोल झाली आहेत.त्यांच्या स्वप्नाळू डोळ्यांची प्राणज्योत मालवली आहे.
खरंतर भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून असुरांच्या तावडीतून देवांची सुटका केली. आणि त्याचंच प्रतीक म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते.आपल्या भारत देशाला गृहणासरखा चिकटलेला हा नरकासुर अजून किती निष्पाप जवानांचा बळी घेणार आहे? या नरकासुराचा जोपर्यंत वध होत नाही तोपर्यंत खूप मोठी स्वप्न उराशी बाळगून देशसेवेत रुजू होणारे आपले सर्व जवान धोक्याच्या आणि अनिश्चितेच्या सावटाखालीच असतील यात शंका नाही.यासाठी भारतीय सेनेनं सुदर्शन चक्र फिरवून या नरकासुराचा लवकरच वध करावा आणि भारतीय सेनेला तणावमुक्त सेवा द्यावी.
दिवाळीच्या या उत्सवात आपल्या महाराष्ट्रातील दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आईवडिलांनी आपल्या मुलाला,बहिणीने आपल्या भावाला गमावलं आहे.त्यांच्या आयुष्याची काठी परमेश्वराने हिरावून घेतली आहे.
आपण प्रत्यक्ष जरी आपल्या शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील होऊ शकत नसलो तरी एक मात्र नक्कीच करू शकतो.आज आपण साजरा करतो आहे.संपुर्ण भारत रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन जातो.आपल्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने एक दिवा प्रज्वलित करू. दिव्याच्या प्रकाशाने भलेही या कुटुंबावर झालेला हा मोठा आघात आपण प्रकाशमय जरी करू शकत नसलो, तरीही आपल्या जवानांच्या त्यागाला,त्यांच्या बलिदानाला दिव्याच्या प्रकाशाने मानवंदना मात्र नक्कीच देऊ शकतो.त्यांच्या शौर्याला आणि बहादुरीला सलामी मात्र नक्कीच देऊ शकतो.
संकल्प करा,
दिवाळी सणाचा एक तरी दिवा प्रज्वलित करू वीर जवानांच्या त्यागाचं प्रतीक म्हणून, त्यांनी दिलेल्या बलिदानाचं प्रतीक म्हणून,त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून.
लेखन,
डॉ. मनिषा मोरे
4 Comments
Nice .....
ReplyDeleteRest in peace 💐💐
ReplyDelete💐💐
ReplyDeletetejas2472007.blogspot.com
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏