Vyatha Shetkaryanchi... | व्यथा शेतकऱ्यांची

व्यथा शेतकऱ्यांची


अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 


अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान,मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल
व्यथा शेतकऱ्यांची

उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल, मे महिन्यात शेताची नांगरणी करून शेत चांगलं तापून दिलं जातं आणि मग शेताची योग्य ती मशागत करून मृग नक्षत्र सुरू झालं की शेतात पेरणी केली जाते.ज्वारी,भुईमूग,सोयाबीन आणि कडधान्य इत्यादी पिकांच्या पेरण्या करून शेतकरी राजा निश्चिंतपणे राहून सर्व काही निसर्गावर आणि परमेश्वरावर सोडून मनापासून शेताची काळजी घेतो.पिकं उगवून आली की त्याची भांगलनी करणं,वेगवेळ्या प्रकारची खतं देणं,वेगवेगळ्या प्रकारच्या औषोधांची फवारणी करणं, आई आपल्या लहान लेकराची जशी काळजी घेते तशीच आपल्या पिकांची काळजी शेतकरी राजा घेतो.ऊन,वारा आणि पाऊसही प्रसंगी अंगावर झेलतो पण आपल्या पिकांना काही होऊ देत नाही.

जून महिन्यापासून ते सप्टेंबर व ऑक्टोबर पर्यंत शेताची आणि पिकांची सर्वोतोपरी काळजी घेतली जाते.त्याच्या हातात जे काही आहे ते सर्व तो करतो.

शेत फुललेलं पाहून,पिकं भरात आलेली पाहून त्याचा आनंद गगनात मावत नाही.त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर अलगद दिसून येतो.शेतात काम करायला त्याला अजूनच ऊर्जा मिळते.तो अजून जोमाने शेतात काम करतो.

याच पिकांच्या जोरावर त्याचा व त्याच्या कुटुंबाचा वर्षभराचा खर्च भागत असतो.वर्ष भर पुरेल एवढं धान्य कसं पिकेल आणि त्यातून चार पैसे कसे जमा होतील या गोष्टींचं समीकरण सतत त्याच्या डोक्यात सुरू असतं.

ऑक्टोबर महिना उजाडला.शेतकरी राजा खूप खुश होता.त्याची पिकं खूप जोमानं वाढली होती आणि आता काढणीला आली होती.काही पिकं कापणी करून शेतातच काढून टाकली होती.काही पिकं काढायला चालू केली होती.  

मात्र निसर्गाला आणि वरूण राजाला हे मान्यच नव्हतं.त्याने जणू ठरवूनच ठेवलं होतं, आपली अवकृपा दाखवायची आणि शेतकरी राजाच्या डोळ्यासमोर सर्व काही उदवस्त करायचं.वरूण राजा गरज नसताना धो -धो बरसायला लागला.

दोन दिवसांत तो इतका बरसला, इतका पाऊस पडला की बघता बघता ओढा, नदी नाले यांना पूर आला.पूल कोसळले.रस्ते बंद झाले.जीवित आणि वित्त हाणी झाली.या मुसळधार पावसामुळे सर्वांचेच हाल हाल झाले मग शेतकरी राजा यातून कसा सुटेल.

शेतं पाण्यानं तुडुंब भरली.शेतकऱ्याने सोयाबीन, भात ,कांदा आणि भुईमूग काढून शेतात ठेवला होता.थोडं ऊन मिळालं की त्याची मळणी किंवा काढणी केली जाते.मात्र वरुण राजानं आणि त्याची श्रध्दा असलेला त्याचा परमेश्वर या दोघांनीही त्यांची अवकृपा दाखवली.

दोन ते तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले.भुईमूग शेतात काढून टाकला होता तो साठून राहिलेल्या पाण्याने कुजून गेला.भुईमुगाच्या दाण्यांना कोंब आले.भाताचं शेत सततच्या पावसाने अगदी झोपून गेलं.कांदा कुजून गेला.शेतात लावलेल्या भाताच्या पिकाच्या,सोयाबीन पिकाच्या ज्या गंज लावल्या होत्या ते ढीग कागदाने झाकून ठेवले होते ते सर्व पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले.

हातातोंडाशी आलेला घास त्याच्या डोळ्यासमोर महापुराने वाहून नेला.त्याच्या पिकाचे ढीग अवकाळी पाऊस वाहून नेत असताना उघड्या डोळ्याने बघण्या पलीकडे तो काहीही करू शकला नाही.हा अवकाळी पाऊस त्याची पिकं वाहून नेत नव्हता तर त्याच्या डोळ्यासमोर त्याची स्वप्न उदवस्त करत होता ,वाहून जाणाऱ्या पिकासोबत त्याची स्वप्न ही वाहून चालली होती.

Vyatha shetkaryanchi , shetkari manogat,avkaali paaus,अवकाळी पाऊस
व्यथा शेतकऱ्यांची

त्याच्या डोक्यात सुरू असणारी त्याची वर्षभराची समीकरणं जमीनदोस्त झाली,मातीमोल झाली.खरंतर वरुण राजाला काहीतरी त्रास झाल्याप्रमाणे तो  मुसळधार बरसत होता.तो बरसत होता आणि शेतकरी राजा ढसा ढसा रडत होता.तो मनातल्या मनात,आतल्या आत  इतका  रडत होता जणू त्याच्या मनातच महापूर आला होता.हा महापूर मात्र काही तरी वाहून नेण्यासाठी आला नव्हता तर त्याची वर्षभराची मिळकत त्याच्या डोळ्यासमोर वाहून गेल्याने आला होता.

आता आपलं कसं होणार?, आता आपलं काय होणार? , आता खायचं काय?, आता जगायचं कसं? या आणि अशा अनेक प्रश्नांचा महापूर त्याच्या मनात आला होता.

शेतकरी राजाचं हे वर्षानुवर्षे असंच सुरू असतं. सगळंच बेभरवशाचं. कधी कडक उन्हामुळे सगळं करपून जातं तर कधी अवकाळी, मुसळधार पावसाने सगळं वाहून जातं, सगळं मातीमोल होतं. निसर्गाची किमयाच न्यारी.दिलं तर इतकं देतो की शेतकरी राजाचा आनंद ओसंडून वाहत असतो एवढी मोठी कृपादृष्टी दाखवतो.आणि नाही म्हणजे इतकी अवकृपा दाखवतो की बघता बघता त्याच्या डोळ्यासमोर सगळं वाहून घेऊन जातो.कधी शेतकऱ्याच्या पदरात पाडतो तर कधी महापुराबरोबर घेऊन जातो.

नोकरदाराला त्याच्या कामाचा मोबदला महिना भरला की लगेच मिळतो.त्याचा महिन्याभराचा खर्च मिळणाऱ्या पगारात भागत असतो.पुन्हा नवीन महिना, पुन्हा पगार.पैशाविना त्याचं कधीच काही नडत नाही.त्याला कधीच पैशाची जास्त वाट पहावी लागत नाही.शेतकरी राजाचं मात्र तसं नाही.एक हंगाम वाहून गेला,उदवस्त झाला की त्याला पुन्हा नव्याने कष्ट करावे लागतात.पुन्हा नव्याने शेतीची मशागत करावी लागते.पुन्हा नव्याने खतंपाणी करावं लागतं.आणि हे सर्व करायचं म्हणजे त्याला पैसा लागतो.चालू हंगाम वाहून गेला,कुजून गेला.सगळं मातीमोल झालं मग त्याच्याकडे पैसा कुठून असणार?.इथं खायचे वांदे झाले असताना पुढच्या हंगामासाठी पैसा आणणार कुठून.मग बँकांचे कर्ज, सावकाराचे कर्ज घेण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच राहत नाही. 

कर्जाचा बोजा सहन झाला नाही म्हणून तो वेडावाकडा विचार करून मानसिक संतुलन बिघडवून बसतो.कितीतरी शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे मरणाला जवळ केलं आहे.

कृषी प्रधान असणारा आपला देश.जगाचा पोशिंदा असणारा आपला शेतकरी राजा मात्र सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे या शेतकरी राजाची की त्याचं नशीब सुद्धा त्याला नेहमीच हुलकावण्या देत राहतं.

आपल्या घरात,आपल्या आजूबाजूला आपले शेतकरी बांधव असतील तर त्यांना मानसिक आधार द्या.त्यांना प्रोत्साहन द्या.आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करू शकतो.शेताचा माल विकत घेताना शक्यतो शेतकऱ्याकडूनच विकत घ्या तेवढीच त्याला आर्थिक मदत होईल.त्याच्या कष्टाची कुणीतरी दखल घेतो असं त्याला वाटेल.खरंच खूप मोठं नुकसान झालं आहे.आणि अजूनही होतंच आहे.आपापल्या परीने शेतकऱ्यांचं मनोबल वाढवता आलं तर बघा. शेवटी शेतकरी जगला तर जग जगेल.




लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
वशी-कासारशीरंबे
व्हाट्सएप--9511775185
डॉ. मनिषा मोरे, Dr.Manisha More, motivations to you







Post a Comment

1 Comments

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏