अन ते राहूनच गेलं.......

         

              अन ते राहूनच गेलं........



माझ्या सगळ्या मैत्रिणी कधी ना कधी गप्पा चालू असताना हे वाक्य नक्कीच म्हणत असतात " अन ते राहूनच गेलं बघ". खरं तर या गोष्टीचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर असं दिसून येत की आपण आपलं बालपण फक्त स्वतःसाठी अगदी बिनधास्तपणे मनसोक्तपणे जगतो. त्यानंतर तरुणपणी शिक्षण घेण्यासाठी आणि आई वडिलांचे संस्कार जपण्यासाठी जगतो.

मग लग्न होतं, संसार सुरू होतो. हळू हळू आपल्या लाईफचं प्रमोशन होत जातं. सर्वात पहिलं प्रमोशन म्हणजे बायकोचं. आणि या प्रमोशन सोबत वेगवेगळ्या जबाबदऱ्याही आपोआपच मिळत जातात.

आणि यानंतर मात्र सुरू होतो बिन पगारी फुल अधिकारी जॉब. बायकोचं कर्तव्य, सुनेच कर्तव्य, आईचं कर्तव्य, म्हणजेच काय तर सासर आणि महेर ह्या दोन्ही ठिकाणची कर्तव्ये. ही सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी तिची ड्युटी 24/7 असते. म्हणजेच आठवड्याचे सात दिवस 24 तासाची ड्युटी असते. तिला सुट्टी कधी नसतेच मुळी. ना शनिवार ना रविवार, ना सनावाराची सुट्टी, ना दिवाळीची सुट्टी ना उन्हाळ्याची सुट्टी.

याउलट सुट्टीच्या दिवशीचे वेगळे बेत असतात. नवऱ्याचे आवडीचे वेगवेगळे पदार्थ, मुलांच्या आवडीचे वेगळे पदार्थ, सासुसासऱ्याच्या आवडिनिवडी यामध्ये तिचा दिवस कसा जातो हे तिला ना कुणालाच कळत नाही. आपली मुलं, नवरा हे सर्वजण त्यांचा विकेंड साजरा करत असतात. विकेंड आहे एकच तर दिवस सुट्टी असते त्यामुळे उशिरा उठणं, उशिरा आवरणं हे आपसूकच आलं. ती बिचारी मात्र कोणत्याही प्रकारचा आवाज न करता नेहमीप्रमाणे लवकर उठून कामाला लागते. तिची सर्व कामं आटोपून सुट्टीचा वेगळा नाष्ट्याचा बेत करते. तिचं म्हणणं एकच असतं रोजचं तेच तेच खाऊन पोरं, नवरा बोअर होतात म्हणून वेगळा जरा चमचमीत बेत. बघा किती विचार करते ती तुमचा.

सगळं बनवून झाल्यावर मग येतात सगळेजण ताव मारायला. हे सगळं झालं की मग जेवणाचा वेगळा बेत. मग जेवणाच्या वेळा पाळा, हे जिभेचे चोचले पुरवत असताना घराची साफसफाई व बाकीची कामं करता करता 4 कधी वाजतात हे कळतच नाही.

हे होतं न होतं तोवर सुरू होते संध्याकाळच्या कामांची तयारी. भाज्या आणण्यापासून, भाज्या आणताना सुद्धा मुलांना कोणती भाजी आवडते, नवऱ्याला कोणती भाजी आवडते, अजून घरी कोण असेल तर त्यांच्या आवडीची भाजी कोणती. मग भाज्या साफ करण्याचे काम, संध्याकाळच्या चहापान ची तयारी, रात्रीच्या जेवणाची तयारी करणे, आवडीनुसार रात्रीचा बेत करणं रात्रीची कामं आटोपून निवांत वेळ मिळण्यासाठी रात्रीचे 11 तरी नक्कीच वाजतात.

हे झालं एका दिवसाचं टाईम टेबल असे आठवड्याचे सातही दिवस तिचं टाईम टेबल बिना ब्रेकचं सुरू असतं. बरं हे करत असताना तिच्या पोस्ट म्हणजे तिची पदं बदलत असतात.  या वेगवेगळ्या  पदभारांसाठी पगार मात्र ठरलेला नसतो.

तिच्या अपॉइंटमेंट मध्ये ना कुठं ब्रेक ठरलेला असतो, ना कामाची वेळ ना कामाचे तास ठरलेले असतात, ना पगार ठरलेला असतो, ना कुठलं वेतन आयोग  ठरलेलं असतं. ती फक्त बिनपगारी फुल अधिकारी असते. तिची ड्युटी फुल टाईम पर्मनंट 24/7 असते.

अजून एक महत्त्वाचं म्हणजे ती जर नोकरी करत असेल तर तिची कसरतच असते. कारण घरातील बिनपगारी जॉब आणि बाहेरील पगारी जॉब ह्या दोन्हीचा मेळ घालता घालता बिचारी थकून जाते. नोकरीतून मिळणारा पैसा सुद्धा घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट घेण्यासाठी, नवऱ्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी तसेच मुलांच्या भविष्यनिर्वाहासाठी वापरते. नोकरी करताना देखील तीचं अर्ध लक्ष आपल्या पोराबाळांकडेच असतं. मुलं लहान असतील तर त्यांना डे केअर ला वगैरे ठेवायची वेळ आली असेल तर तिला कधी एकदा आपलं काम संपवून आपल्या लेकरांच्या जवळ पोहचतो असं होतं. तिला कामाच्या ठिकाणी वेळ झाला किंवा मीटिंगसाठी थांबावं लागत असेल तर मात्र तिची घालमेल होते. तिचं लक्ष मिटिंग मध्ये बॉसकडे नसतंच मुळी. तिचं लक्ष घड्याळाच्या काट्याकडेच असतं. कधी आपला बॉस थांबतो आणि आता घरी जा म्हणून सांगतो याकडेच असतं. 

पोरं, बाळं, संसार, नोकरी, जबाबदाऱ्या एवढं सगळं करत असनाना या सगळ्या मध्ये मी कुठे आहे का? हा प्रश्न मी मला स्वतःला विचारला पाहिजे. मी कधी तरी म्हंटलं पाहिजे की दिवसातला थोडा तरी वेळ मी माझ्यासाठी जगेन. मैत्रिणींनो आपलं आयुष्य नश्वर आहे. रोज एक एक दिवस आपल्या आयुष्यातील कमी कमी होत असतो. मी माझी कर्तव्य पार पाडत असताना माझ्या इच्छा आकांक्षा  मी नेहमी दूरच ठेवत असते.

एखादी गोष्ट करण्याची माझी कितीही इच्छा असली तरी उद्या परवा बघू म्हणून मी नेहमी माझ्या इच्छा मारत असते. मात्र मैत्रिणींनो तो उद्या कधी माझ्या आयुष्यात येतच नाही. मुलांच्या आणि नवऱ्याच्या इच्छेपुढे माझ्या इच्छा कवडीमोल असतात. कुठं बाहेर जायचं जरी म्हंटलं तरी सगळ्या गोष्टीचं नियोजन करून मला बाहेर पडावं लागतं. मला परवानगी घेवूनच बाहेर जावं लागतं. बाहेरून कितीही कंटाळून आले तरी पुन्हा मला कामाला लागावं लागतं. मी आजारी पडले तर घराचं नियोजन पूर्णपणे कोलमडून पडतं.

नोकरदारांना सुट्टी घ्यायची असेल तर बॉसला आपल्या जागी पर्यायी व्यवस्था द्यावी लागते मगच सुट्टी मिळते. पण सुट्टी मात्र नक्की मिळते. इथं मला मात्र आजारी पडून चालतच नाही. कारण मला सुट्टी घेता येत नाही ना. मी घरातील होल आणि सोल असा नोकर आहे, जिथे माझ्या कामासाठी घरामध्ये कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नाही. आणि समजा जरी चुकून आजारी  पडलेच तर इंजेक्शन घेऊन औषधांचा डोस घेऊन ड्युटी पूर्ण करावीच लागते. पर्यायच नसतो.

मैत्रिणींनो मी मुलांना मोठं करेन, त्यांच्या शिक्षणाची काळजी घेईन, मुलं खूप शिकतील, चांगल्या नोकऱ्या मिळवतील, खूप पैसा कमवतील, मग लग्न करतील आणि नोकरीच्या निमिताने माझ्यापासून लांब निघून जातील. अर्थात नोकरीसाठी बाहेर जाणं ही काळाची गरज असेल. मात्र त्यानंतर मी एकटीच असेल. आणि मग हळू हळू मला आठवेल की मी माझ्या इच्छा मारत जगले. पोरांना मोठं केलं सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या पण आज मात्र मी एकटीच आहे. मग मी विचार करत बसेन की मी पोरांसाठी एवढं केलं आणि पोरं मात्र मला सोडून नोकरीच्या निमित्ताने बाहेर निघून गेली. त्यावेळेस मात्र मी असं केलं, मी तसं केलं या गोष्टींचा विचार करून माझ्या आयुष्यातील महत्वाची वेळ जी निघून गेलेली असेल ती परत कधिच येणार नाही. ज्या वयात ज्या वेळेत मी माझ्यासाठी सुद्धा थोडा वेळ द्यायला हवा होता ती वेळ, ते आनंदाचे क्षण जे माझ्या हातून निसटून गेले ते मला परत कधीच आणता येणार नाहीत. ती गेलेली वेळ मी परत कधीच आणू शकणार नाही.

त्यामुळे मी रोज असा विचार करून जगायला पाहिजे की जे काही करेन ते आज करेन. माझ्यासाठी मी आजच वेळ देईन. माझ्या इच्छा मी आजच पूर्ण करेन. मी 24 तासातील काही वेळ स्वतःसाठी जगेन. चांगल्या चांगल्या मैत्रिणी बनवेन, चांगल्या सवयी जोपासेन, स्वतःसाठी नवनवीन गोष्टी शिकेन, नवनवीन गोष्टीचं ज्ञान मिळवेन. मी मला जे काही करायचं आहे त्याची एक लिस्ट बनवेन व त्याप्रमाणे मी माझ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करेन. मात्र त्या आजपासूनच पूर्ण करायचा प्रयत्न करेन. उद्यासाठी त्या मी ठेवणार नाही. कारण मला माहित आहे उद्या कुणी पहिला नाही आणि उद्या कधीही आपल्या आयुष्यात नसतो.

पैसा माझ्याकडे भरपूर असेलही पण तो पैसा माझ्यासाठीच उपयोगात येत नसेल तर काहीच उपयोग नसेल.

माझ्या आवडीनिवडी, माझं फिरणं, माझ्या साठी माझ्या आवडीचे कपडे, माझं खाणंपिणं, माझा वेळ, माझ्या इच्छा आकांक्षा या सर्व गोष्टी मध्ये मी माझी पोरं, माझा नवरा, माझा संसार एवढंच न बघता मी माझ्यासाठी माझ्या तब्बेतीसाठी, माझ्या निरोगी आरोग्यासाठी, सुदृढ निरोगी मनासाठी, शरीरानेच नव्हे तर मनाने ही तरुण राहण्यासाठी व तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करेन व त्यासाठी वेळ देईन.

मैत्रिणींनो आणि जर मी असं केलं तरच जेंव्हा मी चार मैत्रीणी मध्ये बसलेले असेन तेंव्हा माझ्यावर 'अन ते राहूनच गेलं.......' असं म्हणण्याची वेळ येणार नाही.

मैत्रिणींनो स्वस्थ रहा, मस्त रहा, खूप हसा, आनंदी आणि निरोगी जीवन जगा मात्र त्यासाठी थोडासा का होईना स्वतःला  वेळ द्या. 




लेखिका,
डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185


Post a Comment

5 Comments

  1. ।।। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

    ReplyDelete
  2. Khoop chan 👌 Swatasathi vel nakkich dila pahije.

    ReplyDelete
  3. Khrch brobr aahe.......🙏khupch chan lekhn aahe

    ReplyDelete
  4. अप्रतिम, खूप सुंदर

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏