विठू माऊली तू माऊली जगाची
मनुष्य प्राणी स्वतःला फार हुशार आणि बुद्धिमान समजतो.विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर संपूर्ण जगाला बदलून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.तंत्रज्ञानाच्या जोरावर तो काहीही करू शकतो.वेगवेगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी तो नेहमी तयार असतो.त्याने त्याच्यासारखाच काम करणारा मशिन मानव सुद्धा तयार केला आहे.आरोग्य विभागात सुद्धा अमुलाग्र बदल घडवून आणला आहे.याच तंत्रज्ञानाच्या जोरावर तो बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू करू शकतो.एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे.
एवढं सगळं जरी असलं तरी एक वेळ अशी येते की याच बुद्धिमान प्राण्याला तुझ्या मदतीची गरज भासते.ठराविक प्रयत्नांनी तोही सर्वकाही तुझ्यावर सोपवून रिकामा होतो.तुझ्या मदतीचा धावा करतो.त्या हुशार बुद्धिजीवी मनुष्याला तुझं अस्तिव मान्य करावंच लागतं.आमचे प्रयत्न संपले आता, सर्व काही त्याच्या हातात आहे असं सांगून तो रिकामा होतो.
आता खरंच तीच वेळ आली आहे.संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरलेला कोरोना विषाणू या बुद्धिजीवी प्राण्याला आपल्या मृत्यूच्या जाळ्यात ओढून जगाचा नाश करू पाहत आहे.आणि या बुद्धिजीवी मनुष्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून झालेत पण त्याच्या प्रयत्नांना यश काही येत नाही.
हे विठुराया तू संपुर्ण विश्वाचा निर्माता आहेस.तूच आमची माऊली आहेस.तूच आमचा मायबाप आहेस.सकलजनाचे तू श्रद्धा स्थान आहेस.खरं तर तुझ्यापासून काहीच लपून राहत नाही.कारण संपूर्ण जगाचा तूच करता आणि करविता आहेस. कोरोनाला हटवण्यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू आहेत.आमचे सर्व कोरोनायोध्ये दिवसरात्र कोरोनामुक्त होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.तुझी लेकरं खूप मोठ्या संकटात आहेत.खूप मोठ्या मानसिक तणावात आहेत.तुझ्या लेकरांचे खूप हाल होत आहेत रे.
खरं तर वर्षानुवर्षे तुझी भक्ती करणारे तुझे भक्त,तुझी लेकरं आज तुझ्या पायावर माथा टेकवण्यासाठी येऊ शकले नाहीत.हजारो वर्षांची ही भक्तीची सेवा देणारा तुझा वारकरी भक्त तुझ्या पर्यंत येऊ शकला नाही.त्याच्या सेवेला खंड पडला.तुझा भक्त तुझ्यावर आज नाराज आहे.
तुझा भक्त व्याकूळ होऊन तुला हाक मारतोय.त्याच्या डोळ्यातून आता चंद्रभागा वाहू लागली आहे.तुझ्या कृपेचे दरवाजे उघड आता.खरं तर आजवर तुझ्या लेकरांची तू खूप सेवा केलीस.अपार उपकार आहेत तुझे या सकल जगतावर.तुझ्या उपकाराला जगात तोड नाही.आमचा जीव जरी ओवाळून टाकला तरी तुझ्या उपकारांची परतफेड होऊ शकत नाही.
हे विठुराया तुझ्या पावलांची सेवा आम्ही अखंड करत राहू.बिना टाळ, मृदुंग, अखंड हरिनामाच्या गजराशिवाय आणि तुझ्या हजारो भक्तांशिवाय तुझी सेवा अपुरी आहे.तुझं अस्त्र,शस्त्र बाहेर काढ आता.तुझा तिसरा डोळा उघड आणि तुझ्या लेकरांना,तुझ्या भक्तांना या महामारीतून बाहेर काढून वाचव सर्वाना.तुझ्या सर्व लेकरांचं कोरोनापासून संरक्षण कर.तुझ्या लेकरांचे होणारे हाल थांबव.आम्ही आता सर्व तुझ्यावर सोडून दिलं आहे.
सर्व कोरोना योध्यांना कोरोनवर मात करण्यासाठी ताकद दे.तू निर्माण केलेल्या या जगाला, विश्वाला सर्वनाश होण्यापासून तूच वाचवू शकतोस.ती ताकद फक्त तुझ्यातच आहे.देश कोरोनामुक्त होण्यासाठी जे जे कोरोना योद्धा लढत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे.आमच्या सर्व यातना दूर होऊ दे.पुन्हा एकदा खूशहाल जीवन जगण्याची ताकद सर्वाना मिळू दे.आणि तुझ्या भक्तीत कधीच खंड पडू नये व आमच्याकडून तुझ्या पाऊलांची अशीच अखंड सेवा घडू दे.
पुन्हा एकदा अखंड हरिनामाचा गजर होऊ दे त्या हरिनामाच्या गजरात तुझा भक्त तुझी लेकरं पुन्हा तल्लीन होऊन नाचू दे हाच आशीर्वाद तुला मागत आहोत.माझी माऊली आपल्या लेकरांना कधीच उघड्यावर टाकणार नाही याची आम्हाला खात्री आहे.आता सर्वकाही तुझ्यावर सोपवून देतोय आम्ही.सावर सर्वाना.तुझी कृपादृष्टी कधीच हटवू नको.ह्या भोळ्याभाबड्या भक्ताची आर्त विनवणी मान्य कर.
1 Comments
Khoopach bhavpurn 👍👌🙏🙏🙏🙏
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏