गुरू कोणास म्हणावे?


गुरू कोणास म्हणावे?

आज माझं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे,संस्कारांची शिदोरी ज्यांनी दिली,ज्यांनी माझं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी माझी जडणघडण केली ते माझे आईबाबा माझे गुरू।


दिनदुबळ्या समाजानं शिकावं,अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, स्त्रियांनी शिकावं अबला नाहीतर त्या सबला व्हाव्यात म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते सावित्री ज्योती माझे गुरू।


आयुष्याची बाराखडी लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी ज्यांनी तयार केलं ते माझे पहिले शिक्षक माझे गुरू।


आयुष्याचे धडे वाचण्यासाठी,काय मिळवायचं काय वजा करायचं  कशाला गुणायचं आणि कशाला भाग घालवायचा हे आयुष्याचं गणित शिकवणारे,शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्यावर करियरची वाट दाखवणारे माझे शिक्षक माझे गुरू।


जीवनाच्या खडतर प्रवासात माझी हक्काची माणसं,माझे सर्व नातेवाईक,  मित्र मंडळी,शेजारी पाजारी माझ्यासोबत सहप्रवाशी होऊन सुखात आनंदी झाले तर दुःखाचा भार कमी केला, तसेच माझी प्रगती झाली म्हणून माझ्यावर जळणारे  माझे निंदक  हे सर्वच माझे गुरू।


नोकरीच्या ठिकाणी काम चुकलं म्हणून ओरडा देणारे व प्रसंगी कामाचं कौतुक करणारे माझे सर्व बॉस माझे गुरू।


यशाच्या शिखराकडे मार्गस्थ होताना आनंद देणारे ,प्रसंगी रडायला लावणारे तसेच प्रोत्साहन देणारे असे माझे बरे वाईट अनुभव माझे गुरू।।


आपल्या संथांची परोपकारी वृत्ती,शंभूराजाचा त्याग,शिवबाची धडाडी आणि दूरदृष्टी,जिजाऊ चा मुत्सद्दीपणा या सर्वांच्या चरित्रा मुळे प्रेरणा मिळते जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो हे  सर्वजण माझे गुरू।

फुलांकडून सतत हसत राहण्याचा गुण, झाडांकडून खंबीरपणे उभे राहण्याचा गुण, वाहणाऱ्या पाण्याकडून न थांबता मार्ग काढत राहण्याचा गुण ही सर्व निसर्गाची किमया म्हणून निसर्ग माझा गुरू।

लहान मुलांची निरागसता, खेळकर पोरांचा खोडकरपणा, तारुण्याचा स्वप्नवादीपणा आणि नंतर आलेला जबाबदारपणा हे सगळे गुण माझे गुरू।


संपुर्ण जगाला आपल्या जवळ घेऊन येणारे माहिती तंत्रज्ञान,माझं ज्ञान माझी कला लोकांच्यापर्यंत नेण्यास मदत करणारे सोशल मीडिया,मला काही येत नसेल तर त्याचं उत्तर पटकन शोधुन देणारे गुगल हे सर्वच माझे गुरू।

माझं लिखाण तुम्ही वाचता आणि तुमच्या प्रतिक्रिया पाठवता त्यामुळे खरं तर लिखाणाची प्रेरणा मिळते,माझ्या लेखणीला बळ मिळतं.तुम्ही आहात म्हणून माझं लिखाण आहे आणि म्हणूनच माझ्या लेखणीला ओळख करून देणारे माझे सर्व वाचक माझे गुरू।


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः।।

गुरू म्हणजे कोण, आपल्या जीवनातील गुरूंचे महत्व

गुरुपौर्णिमा शुभेच्छा


लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185


Post a Comment

4 Comments

  1. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
    ,🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

    कृपया तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा

    ReplyDelete
  2. Khupach Sundar mandl aahe

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏