अनपेक्षित 2020

 अनपेक्षित 2020 

Unexpected Things in Year - 2020




कोविड 19, कोरोना व्हायरस, vivid 19,corona virus, unexpected year 2020
हे पाळा

Unthought-of Year 2020

वर्ष  2020 आणि अनपेक्षित गोष्टी


आपल्या भारत देशातील पहिला कोविड 19 म्हणजेच कोरोना पेशंट चीन मधून भारतात आला आहे हे 30 जानेवारी 2020 ला जाहीर झालं . 

महाराष्ट्रात सर्वात प्रथम पहिला कोरोना पेशंट पुणे येथे 9 मार्च 2020 ला सापडला.9 मार्च ते 21 मार्च 2020 पर्यंत कोरोना पेशंट हळू हळू वाढत चालले होते आणि संपूर्ण भारतभर त्याचा प्रसार झाला. 

22 मार्च 2020 रोजी फाळणीनंतर पहिल्यांदाच जनता कर्फ्यु जाहीर झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी जनता कर्फ्यु जाहीर केला. कोरोना संक्रमण थांबवणं हाच जनता कर्फ्यु चा उद्देश होता.

14 तासांचा जनता कर्फ्यु झाल्यानंतर 24 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला.मेडिकल सुविधा वगळता बाकी सर्व शाळा आणि कॉलेज,सरकारी तसेच खाजगी कार्यालये, सर्व कंपन्या,सर्व छोटेमोठे व्यापार,सर्व मार्केट,सर्व दुकानं ,सर्व मॉल,सिनेमागृह इमर्जन्सी सेवा वगळता सर्व काही बंद झालं.

पहिल्यांदाच सलग 21 दिवसांसाठी देश बंद करण्याची वेळ देशावर आली होती.एवढं मोठं संकट 100 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशावर आलं होतं.

गावोगावी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले.सर्व रस्ते बंदी,नाका बंदी करण्यात आली.रस्ते ओस पडले.सर्व रेल्वे,विमानसेवा एसटी सेवा सगळं काही बंद करण्यात आलं.छोटी मोठी सर्वच हॉटेल्स बंद झाली.संचारबंदी लागू झाली.जमाव बंदी लागू झाली.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या बऱ्याच लोकांना पोलिसांचा चोप बसला.गावांना,शहरांना रस्त्यांना छावण्याचं स्वरूप आलं होतं.पोलिसांबरोबरच सीआरपीएफ जवान, मिलिटरी जवान देखील तैनात करण्यात आले.आजतागायत च्या आयुष्यातला हा असा पहिलाच महाभयंकर अनुभव होता. 

किती महाभयंकर हा व्हायरस ज्याचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी एवढी मोठी फौज तैनात झाली होती.मात्र आपलं कर्तव्य बजावणाऱ्या बऱ्याच योध्याना या कोरोना संक्रमनामुळे आपल्या प्राणाला देखील मुखावं लागलं.

सोशल डिस्टनसिंग, मास्क तसेच हँड वॉश आणि सॅनिटायझर या गोष्टी प्रचलित झाल्या.मास्क शिवाय फिरणाऱ्यांना आणि सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्यांना दंड जाहीर झाले.जिल्हा बंदी जाहीर झाली.जिल्हा हद्दीवर चेकपोस्ट सुरू झाले.जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास बंदी लागू झाली.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालये देखील बंद होती.लोकसभा,राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद बंद ठेवण्यात आली होती.सोशल डिस्ट्सनसिंग म्हणजे काय हे खरोखरच समजलं जेव्हा सर्व मुख्यमंत्री, पंतप्रधान तसेच क्लेकटर आणि प्रशासकीय अधिकारी जेव्हा त्यांची कामं, त्यांच्या मिटिंग ह्या सोशल मीडियावरून करू लागले.सर्वजण घरी बसूनच आपापली कामं झूम मिटिंग ,मिट मिटिंग, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करू लागले.

शाळा कॉलेज बंद झाली, कंपन्या बंद झाल्या आणि काही दिवसांनी पुन्हा सुरू देखील झाल्या.मात्र प्रत्यक्षात सुरू न होता ऑनलाइन च्या माध्यमातून सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर चा हा पहिलाच अनुभव होता जिथं कंपन्यांनी त्यांचं काम त्यांच्या एम्प्लॉयी ना घरी बसून करायला सांगितलं.शाळा व कॉलेज ऑनलाइन सुरू झाली.अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा मोबाईल वर ऑनलाइन शिक्षण घेऊ लागली.हे पहिल्यांदाच होत होतं.

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सर्व काही बंद केलं गेलं मात्र बंद करून देखील सर्व काही सुरूच होतं. ही आहे आयटी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ची किमया.आजपर्यंत च्या काळातला सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजी चा वापर कधी झाला असेल तर तो 2020 मध्ये.अगदी मंत्रालयापासून ते सामान्य ते सामान्य लोकांपर्यंत या टेक्नॉलॉजी ने आपली जादू दाखवून दिली आहे.सर्वच स्तरांमध्ये आयटीचा वापर करून आपापली कामं केली जाऊ लागली.

मार्च 2020 पासून चित्रपट सृष्टी आणि टीव्ही माध्यमं फक्त न्यूज माध्यमं सोडून चार पाच महिन्यांसाठी पहिल्यांदाच पूर्णपणे बंद होती.नवीन पिक्चर नाही,नवीन मालिका नाही सर्वच बंद होतं.

संपुर्ण देशभरातील मंदिरांना कुलूपं लावावी लागलीत हे देखील पहिल्यांदाच.मोठमोठी तीर्थक्षेत्र जिथं लोकांची जास्त गर्दी असते अशी सर्व तीर्थक्षेत्र पहिल्यांदाच ओस पडली.लोकांची गर्दी होऊ नये आणि कोरोनाचं वाढतं संक्रमण थांबवावं यासाठी देवांना देखील कोंडून ठेवलं तेही पहिल्यांदाच.

शेकडो वर्षांची परंपरा असणारी आषाढी वारी जिथं वारकरी संप्रदाय गावागावातून पायी चालत जाऊन आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो ती वारकऱ्यांची वारी , वारकऱ्यांची श्रध्दा इतक्या वर्षात पहिल्यांदाच होऊ शकली नाही.लाखो करोडो भक्तांचं पंढरपूर हे श्रद्धास्थान इतक्या वर्षात पहिल्यांदाच बंद ठेवावं लागलं होतं.मंदिराला टाळा लावावा लागला.

2020 या वर्षात सण,उत्सव, समारंभ यांचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं आहे.या वर्षात पहिल्यांदाच नवरा,नवरी,भटजी,आणि लग्नाला आलेल्या सर्वानाच मास्क लावून लग्नाला उभं रहावं लागलं होतं.

सर्व देवांचं आराध्य दैवत श्री गणपती म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा सण गणेशोत्सव देखील आपल्याला सार्वजनिक रित्या साजरा नाही करता आला.संपूर्ण देशभरात आणि खासकरून महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची खूप वर्षाची परंपरा आहे.त्याच्या मागे मोठा इतिहास देखील आहे, मात्र 2020 या वर्षात या परंपरेला पहिल्यांदाच खंड पडला.लोकांना बाप्पाला घरी घेऊन येताना तोंडावर मास्क लावावा लागला आणि हाताला सॅनिटायझर लावावं लागलं.

विषेश म्हणजे कोरोनाच्या काळात एकही राजकीय सभा नाही, कोणतेही समारंभ नाहीत,लग्न करायला सुद्धा काही काळ बंदी आणली होती.पर्यटन स्थळे सुद्धा बंद होती.पर्यटक कुठेही फिरायला जाऊ शकत नव्हती.एव्हढच काय तर मार्च 2020 ते मे 2020 पर्यंत ची पर्यटनाची रेल्वेची , विमानाची ट्रॅव्हलिंगची सर्व बुकिंग रद्द करण्यात आली.

इंग्रजांच्या काळापासून धावणारी मुंबईची जीवनदायिनी , मुंबईची जान ,मुंबईची रेल्वे ,लोकल आजतागायत च्या अनुभवात पहिल्यांदाच बंद करण्यात आली. लाल परी म्हणजेच एसटी देखील पहिल्यांदाच बंद झाली.

दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टीला मामाकडे जायची परंपरा देखील खंडित झाली.लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली थोडे दिवस का होईना माहेरी येतात मात्र कोरोनाचं वाढतं संक्रमण आणि जिल्हाबंदी यामुळे पहिल्यांदाच मुली आपल्या माहेरी येऊ शकल्या नाहीत.

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन वर लॉकडाऊन जाहीर झाले तरी देखील कोरोनाने आपली मुळं संपुर्ण भारतभर पसरविली होती.हळूहळू त्याचा प्रसार एवढ्या मोठ्या संख्येने झाला की आता कुठल्याही प्रकारची लक्षणं नसताना देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत.पहिल्यांदाच साधा सर्दी ताप असणाऱ्या पेशंटला डॉक्टर न तपासताच पेशंट ला बिना हात लावताच औषध देऊ लागली.म्हणजेच डॉक्टर सुद्धा आता घाबरले आहेत या कोरोना संक्रमनाला.

आपल्याकडे पद्धत आहे एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याला खाऊ घेऊन बघायला जायची.ह्या आजारात मात्र कोरोना पेशंट जवळ ना आई,ना वडील,ना भाऊ,ना बहीण, ना इतर कोणी नातेवाईक त्याने एकट्यानेच आजाराशी झुंज द्यायची आहे.ऍडमिट करायला देखील जायची गरज नाही त्यांचीच ऍम्ब्युलन्स येऊन पेशंट ला घेऊन जाते.आणि मग तो पेशंट आणि डॉक्टर बस् एवढेच लोकं त्याच्या जवळ.

चौदा दिवसांनी बरा होऊन घरी आला तर ठीक जर समजा चुकून दुर्दैवाने त्याचं काही बरं वाईट झालंच तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा नातेवाईकांना कष्ट घ्यावे लागत नाहीत.त्याचं शेवटचं दर्शन देखील त्याच्या नातेवाईकांना मिळत नाही.महानगरपालिका वालेच त्याचे मायबाप होतात आणि शेवटचा अग्नी देतात.

मयतीचं हे महाभयंकर स्वरूप आजपर्यंतच्या अनुभवातील पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. आयुष्यभर सुखी व समाधानी राहण्यासाठी काबाडकष्ट करणारा सामन्य माणूस त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी कुणीही त्याच्यासोबत राहत नाहीत.शेवटी त्याचा प्रवास एकट्यालाच करायचा आहे हे या कोरोनाने दाखवून दिलं आहे.हे देखील पहिल्यांदाच घडत आहे.

ह्या कोरोनाने कित्येक कोविड योद्धा यांचा बळी घेतला.कित्येक निष्पाप मुलांचा,सामान्य जनतेचा बळी घेतला.आणि सर्व जनतेच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं.लोकं कोरोना संक्रमनाच्या आणि त्याच्यामुळे ओढवलं जाणारं मरण याच्याच दडपणाखाली जगतायत.हीच सर्वात मोठी विदारक परिस्थिती वर्ष 2020 ची आहे.




लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185


Post a Comment

1 Comments

  1. खूप छान लिखाण ....सत्य परिस्थिती आहे

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏