भान वास्तविकतेचं ...
मार्च 2020 पासून ट्वेन्टी फोर सेवन न्युज माध्यमं पळून पळून बातम्या गोळा करत होते आणि जीवाचं आकांडतांडव करून कोरोनाच्या बातम्या सांगत होते.जगभरात कोरोनानं कसं थैमान घातलं आहे ,कोरोनाची सुरुवात कुठून झाली, कोणत्या देशात कोरोनाचे जास्त पेशंट आहेत , कोणता देश कोरोना संक्रमणाच्या बाबतीत एक नंबर वर आहे, कोणत्या देशाचे कोरोना मृत्यू जास्त आहेत या सर्व बातम्या बघून आणि ऐकून अक्षरशः आम्हा सामान्य माणसाच्या काळजाचे ठोके प्रत्येक क्षणाला वाढत होते.मनात खूप भीती निर्माण झाली होती. मनाने कोरोनाची खूप धास्ती घेतली होती.
हे बातम्याचं सत्र असंच न थांबता सुरू होतं.प्रत्येक न्युज चॅनेल्स जणू एकमेकांशी स्पर्धा खेळत होते.कुणाचं टायटल कोरोना 100, कुणाचं कोरोना युद्ध , जनता कर्फ्यु , लॉकडाऊन आणि बरंच काही.न्युज अँकर बातम्या अशा प्रकारे सांगायचे ऐकून जणू अंगाचा थरकाप उडायचा.
मग थोड्या दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला केलेलं आव्हान " टाळ्यांचा नाद " आणि " दिव्यांची रोषणाई " या गोष्टी दाखवून आणि लोकांना भावनाविवश होऊन करायलाही ही भाग पाडणारे हेच ते न्युज वाले.कोणत्या मंत्र्याने कुठे उभारून टाळ्या वाजवल्या,कुठल्या मंत्र्याने कुठे कुठे " दिव्यांची रोषणाई केली " हे सगळं दाखवून थोडे दिवस का होईना कोरोनाच्या तणावातून फ्री केलं.
तुम्ही आम्ही सगळे येडे लगेच सोशल मीडिया वर आपापले टाळ्या वाजवणारे तसेच दिव्यांची रोषणाई करणारे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करून लोकांच्या लाईक्स मिळविण्यात व्यस्त झालो.हे सगळं करत असताना कोरोनाची परिस्थिती मात्र "जैसे थी। " किंबहूना अजूनच बिघडत चालली होती.
देश खूप मोठ्या संकटामध्ये होता.कोरोनावर मात करायची असेल तर लवकरात लवकर लस निघणं हा एकमेव उपाय होता.हळू हळू कोरोना बाधितांचे आकडे वाढत होते.चीन , इटली , अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ भरतानेही उच्चांकी आकडा गाठला होता.कोरोना संक्रमणाच्या यादीत सद्य स्थितीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाचं संकट सुरू असतानाच न्युज मीडियाला अजून एक विषय मिळाला.14 जून 2020 रोजी सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली.खरंतर सुशांत च्या बाबतीत फारच वाईट झालं.अप्लावधीतच बॉलिवूड मध्ये स्वकर्तुत्वाने यशाचं शिखर गाठणारा हिंदी सिनेमा सृष्टीचा एक हरहुन्नरी कलाकार अशी ओळख निर्माण करणारा कलाकार अचानक आत्महत्या करून बऱ्याच प्रश्नांना अनुत्तरित ठेऊन या जगाचा निरोप घेऊन निघून गेला.
मात्र त्याच्या अचानक जाण्यानं जणू संपूर्ण देशाला कोड्यात पाडलं होतं आणि मीडियाला आयतं कुलीत मिळालं होतं.त्याच्या बाबतीत खरंच खूप वाईट झालं होतं.मग का, कसा,कधी, कुणामुळे,काय कारणं होती अशा बऱ्याच प्रश्नांवर मीडियावर चर्चासत्र रंगू लागली.हे प्रकरण जवळजवळ दोन महिने चाललं होतं मात्र त्यातून निष्पन्न काहीच होत नव्हतं.
मग यामध्ये कंगना राणावत आली.बॉलिवूड चे बडे बडे हस्ती यामध्ये कसे गोवले गेले आहेत याचा कांगावा केला केला गेला.कलाकारांना कसं दाबलं जात आहे याचा आरोप प्रत्यारोप झाला.सर्व मीडियावर जणू एकच टेप सुरू होती कंगना आणि बस् कंगना.
कंगणाचं पुराण होतं न होतं तोच सेंट्रल गव्हर्नमेंट यामध्ये आली, सीबीआय आली,ईडी आली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर टीका,मंत्र्यांवर टीका,महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास फक्त आणि फक्त आरोप प्रत्यारोप. शेवटी सुशांत ची केस सीबीआय कडे गेली आणि वेगवेगळे धागेदोरे मिळाले. मिडीयाला मात्र रात्रंदिवस चॅनेल चालवण्यासाठी गरमागरम, मसालेदार विषय मिळाला होता.
आता मात्र हद्दच झाली !, मीडियाने वेगळीच टेप वाजवायला चालू केली.रात्रंदिवस एकच टेप वाजत आहे ती म्हणजे कंगना आणि महाराष्ट्र सरकार.हे दोन विषय एवढे गाजू लागले की सोशल मीडिया आणि न्युज मीडियावर फक्त आणि फक्त एकच विषय रंगू लागला. ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, कोण कसं आणि कोण कसं , "अरे बाप रे"!.
तुम्हा आम्हाला बातम्या रंजक वाटाव्यात म्हणून त्याला अजूनच मिर्च मसाला लावून सांगितल्या जाऊ लागल्या.आणि आपण वेडे सद्य परिस्थिती आपल्या समोर काय ओढवली आहे, यातून पुढे काय होणार आहे , कोरोना संक्रमणाच्या यादीत आपलाही नंबर लागू शकतो असे बरेच ज्वलंत प्रश्न बाजूला ठेवून बातम्या बघण्यात व्यस्त झालो.हा विषय बऱ्याच जणांच्या जणू चर्चेचा विषय झाला होता.रोज उठलं की आज सुशांत केसचं नवीन काय, कंगना काय म्हणाली, रिया ने कुणाचं नाव घेतलं , मुंबई पोलीस काय म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या काय प्रतिक्रिया आहेत, विरोधी पक्षाने कुणाच्या नावाने हल्लाबोल केला, सेंट्रल गव्हर्नमेंट कुणाच्या बाजूने या रोजच्या चालू घडामोडी बघत असताना कोरोनाने कधी ऊच्चांकी आकडा गाठला कळलंच नाही.
कोरोना बाधितांचा वाढता आकडा हे दर्शवत होता की, कोरोनाची मुळं संपुर्ण भारतभर पसरली आहेत आणि आता हळूहळू प्रत्येक घरात पोहचायला सुरुवात झाली आहे.हॉस्पिटल फुल झाली आहेत.साधे बेड मिळत नाहीत मग ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर या गोष्टी तरी अगदी मुश्किलीने मिळत होत्या.कित्येक पेशंट ऑक्सिजन अभावी जीवाला मुकले.पेशंट ला नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स मिळेना झाल्या.कोरोना पेशंट ला सोडा अगदी सामान्य आजार असणाऱ्या पेशंट ला देखील इमर्जन्सी मध्ये ऍम्ब्युलन्स मिळेना झाल्या.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तासंतास लागत होता.बऱ्याच ठिकाणी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडताना देखील आपण पाहिलं आहे.
जिवंतपणी काबाडकष्ट करून आयुष्यभर सुखात,आनंदात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुमच्या आमच्या सारखी सामान्य जनता मेल्यावर "त्यांचे हाल कुत्राही खाईना" असे न म्हणता "त्यांचे हाल कुत्राच खाई " अशीच झाली आहे.एवढी ही महाविदारक परिस्थिती सामान्य जनतेसमोर आली आहे.
परवाचा तर संपूर्ण देशभराचा कोरोना बाधितांचा आकडा एकोनव्वद हजार पार केला होता.महाराष्ट्रात बाराशे कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले.हे आकडे दिवसागणिक वाढतच चालले आहेत.
मूळ प्रश्न , जिथं सामान्य जनता मृत्यूच्या दारात उभी आहे. बरेच निष्पाप लोकं मृत्युमुखी पडलेत. हे सर्वच ज्वलंत प्रश्न सोडवणं गरजेचं आहे.. का "कंगना ला वाय प्लस सिक्युरिटी" मिळणं.आणि जर नाही मिळाली तर आंदोलन वगैरे केलं जाईल अशा गोष्टी नेते बोलतायत आणि मीडिया आपल्याला ह्याच बातम्या मिर्च मसाला लावून दाखवतेय.
आज तर हद्दच झाली नेते मंडळी चक्क कंगणाला भेटायला गेली आणि तिला "वाय प्लस सिक्युरिटी" देण्याचं आव्हान देखील करून आलीत.
वाह रे नेते मंडळी ," रोज हजारोंच्या घरात सामान्य जनता मरत आहे याचं तुम्हाला काहीच देणंघेणं नाही ". कुणाचा म्हातारा बाप मारतोय, कुणाचा म्हातारपणीचा त्याचा आधार त्याचा तरुण मुलगा मारतोय, कुणाची आई मरतेय, कुणाचा भाऊ तर कुणाची बहीण.यांना मात्र वाय प्लस सिक्युरिटीचं पडलंय.
यामध्ये दोष कुणाचाच नाही.आपल्याला ही सवय लागली आहे "आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून".आपल्या समोर डोंगर जरी कोसळला तरीही दुसऱ्याच्या बातम्या चघळत बसायची जणू सवयच लागून गेली आहे आम्हा सर्वांना.
"ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं". आपली परिस्थिती "ना घर का ना घांट का " अशीच झाली आहे.यांना मात्र काहीही फरक पडणार नाही.यांच्या साठी 'ए प्लस', 'वाय प्लस', 'झेड प्लस' अशा सुविधा आहेत.मिडियाचा टीआरपी वाढतोय.मीडियाला अमाप पैसा मिळतोय. पिसतोय मात्र तुम्ही आणि आम्ही.
आपण मात्र ऍम्ब्युलन्स च्या ऑपरेटर ला कॉल करून दमून जातोय तरीही ऍम्ब्युलन्स मिळत नाही,मिळाली तर हॉस्पिटल मिळत नाही , हॉस्पिटल मिळालं तर ऑक्सिजन बेड मिळत नाही,ऑक्सिजन बेड समजा मिळालंच तर व्हेंटिलेटरविना जीव जातोय.हे आहोत तुम्ही आणि आम्ही. ही आहे आपल्यावर आलेली जीवघेणी परिस्थिती.
चर्चा व्हायला पाहिजे कोरोनामुळे आलेल्या बिकट परिस्थितीवर, चर्चा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सोयीनियुक्त हॉस्पिटल ची सोय कशी करता येईल, चर्चा सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाची व्हायला पाहिजे, चर्चा शेतकऱ्यांच्या त्रासाची व्हायला पाहिजे,चर्चा व्हायला पाहिजे शाळांचे प्रॉब्लेम आणि शाळेच्या फिजचा तगादा याची,चर्चा व्हायला पाहिजे कोरोना बाधितांचा मृत्यु दर कमी कसा करता येईल,मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची विल्हेवाट योग्य पद्धतीने कशी लावता येईल.
या सर्व गोष्टी जणू गौन आहेत असं मानून प्रत्येक जण एकच टेप वाजवतोय.ही टेप म्हणजे कंगना.या कंगणाला एवढंच काही देणंघेणं असतं तर तिनं देशावरची ही बिकट परिस्थिती आली आहे या मुद्द्यावर आवाज उठवला असता.पण तिनं काय केलं, तर सुशांत च्या मृत्यूचं भांडवल करून पुरे दोन तीन महिने पूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आणि स्वतः फार मोठी शहाणी आहे असं दाखवून द्यायचा प्रयत्न केला आणि अजूनही तेच करतेय.
मात्र आता तरी लक्षात घ्या , कंगणाला ना सुशांत विषयी काय देणंघेणं आहे,ना त्याच्या अनुत्तरित राहिलेल्या प्रश्न विषयीं काही देणंघेणं आहे,ना सामान्य जनतेच्या समस्यांविषयी.तिला फक्त सर्वांचं लक्ष वेधून घेऊन स्वतःचा उदोउदो करून घ्यायचा आहे.न्युज मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला सतत चर्चेत ठेवायचं आहे.न्युज मीडिया मात्र तिच्यामुळे मिळणारा टीआरपी अजिबातच सोडणार नाहीत.
या सर्व गोष्टींचं भान खरंतर, 'ना तुम्हाला ना आम्हाला' हीच सद्य परिस्थितीत मोठी वास्तविकता आहे.
( टीप: हा लेख राजकारण किंवा राजकारणी यांच्यावर टीका करण्याच्या हेतूने लिहिला नसून आजच्या सद्य स्थितीवर आधारित आहे.या लेखमध्ये लिहिलेली सर्व मतं, अनुमान ही वैयक्तिक असून राजकारणाशी त्याचा काहीही संबंध नाही.)
3 Comments
कंगना राणावत, सुशांत सिंह, रिया चक्रवर्ती हे सगळे परप्रांतीय ,दुसऱ्या राज्यातले मग यांच्याबद्दल महाराष्ट्रात दंगा का? मीडिया वाल्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी महाराष्ट्राची शांतता भंग करू नये....
ReplyDelete🙏खुपचं विदारक सत्य , समाजातील कासावीस झालेल्या लोकांची व्यथा, परखड विश्लेषण केले आहे🙏
खूप छान लिखाण केले आहे. जे सध्या सुरू आहे त्या सर्व घटनांवर अचूक असे लिखाण आहे. सामान्य माणसाच्या व्यथा ही अचूक मांडल्या आहेत
ReplyDeleteखूप खूप छान
सध्याच्या परिस्थितीचा आढावा.👍
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏